अमरावती – शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद जिल्ह्यातील दर्यापूर गावातही उमटले आहेत. दर्यापूर येथे १५ जानेवारीच्या रात्री शिवसैनिकांनी ढोल ताशे वाजवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने पुतळा जप्त केला आहे, तसेच लहुजी संघटनेच्या वतीने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा हा पुतळा बसवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पुतळ्यांच्या राजकारणामुळे सध्या अमरावतीसह दर्यापूर शहरात तणावसदृश परिस्थिती आहे.
महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुठलीही अनुमती घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. १६ जानेवारीच्या पहाटे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न लहुजी संघटनेच्या वतीने करण्यात आला. पोलिसांनी हा पुतळा जप्त करून संघटनेचे डॉ. रूपेश खडसे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर सकाळी काही काळ राजापेठ उड्डाणपुलासह आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानाच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून परिस्थिती आटोक्यात आणली. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या शंकरनगर येथील निवासस्थानी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. त्यामुळे युवा स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या घरासमोर जमले आहेत.