मुंबईकरांना महापालिकेच्या ‘ॲप’द्वारे विविध ८० सुविधा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

मुंबई – महापालिकेच्या ८० सेवासुविधा व्हॉट्सॲपवर एका संदेशाद्वारे मिळू शकणार आहेत. पालिकेने याकरिता व्हॉट्सॲप आस्थापनाच्या सहकार्याने नवीन सुविधा विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या सुविधांसाठी रांगा लावण्याची किंवा संकेतस्थळावरही जाण्याची आवश्यकता भासणार नाही. लोकाभिमुख अशा ‘व्हॉट्सॲप चॅट बॉट’ या सुविधेचे १४ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

ही सुविधा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. येथे संदेशाद्वारे नागरिकांना विविध सेवा घेता येतील. या सुविधेत तक्रार किंवा सूचना करण्याची सोय असणार आहे. महापालिकेच्या विविध ऑनलाईन सेवा-सुविधांशी संबंधित अर्ज करण्याची सुविधा आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या ‘गणेशोत्सव मंडप अनुमती’, आपल्या विभागाची माहिती, संबंधित संपर्क क्रमांक आदी माहिती सहज उपलब्ध होतील, असे
डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

महापालिकेशी संबंधित विविध शुल्क, आकार इत्यादींचा भरणा करण्यासाठी ‘यू.पी.आय.’आधारित ऑनलाईन सेवा, महापालिका आणि महापालिका क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडींची अद्ययावत् माहिती, महापालिकेच्या विविध सेवा-सुविधांशी संबंधित प्रमाणपत्रे, अनुमती इत्यादींविषयीची माहितीही याद्वारे मिळू शकणार आहे.

कसे वापराल ?

८९९९२२८९९९ या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘Namaste’ किंवा ‘Hi’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर महापालिकेच्या बोधचिन्हासहित अधिकृत उत्तर प्राप्त होते. याच उत्तरानंतर मराठी वा इंग्रजी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. यांपैकी एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे तीन पर्याय उपलब्ध होतात. यांपैकी कोणत्याही एका पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर महापालिकेच्या सेवा, सुविधांशी संबंधित पर्याय नागरिकांना उपलब्ध होतात.