श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपयोगात आणत असलेल्या ‘लॅपटॉप’च्या स्टिकरवर पडलेला प्रकाश ‘ॐ’च्या स्वरूपात प्रतिबिंबित होणे

साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीचा देह आणि तिच्या वापरातील वस्तू यांमध्येही दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपयोगात आणत असलेल्या ‘लॅपटॉप’वरील स्टिकरवर पडत असलेला प्रकाश ‘ॐ’ च्या स्वरूपात प्रतिबिंबित होण्यामागील शास्त्र या लेखाद्वारे पाहूया.

 

६ ते १३ जुलै २०२० या कालावधीमध्ये श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या कर्नाटकातील मुल्की येथील सनातनच्या आश्रमामध्ये वास्तव्यास होत्या. १२.७.२०२० या दिवशी त्या त्यांच्या ‘लॅपटॉप’वर सेवा करत होत्या. त्यांच्या या नियमित वापरात असलेल्या ‘लॅपटॉप’वर डाव्या बाजूला एक चंदेरी ‘स्टिकर’ असून त्याच्यावर ‘लॅपटॉप’ची माहिती लिहिलेली आहे; पण ती आता पुसट झाली आहे. सेवा करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांनी डाव्या हाताचे कोपर ‘लॅपटॉप’च्या बाजूला पटलावर टेकवून हात वरच्या दिशेने ठेवला होता. त्या वेळी त्यांच्या त्या हाताचे कोपर ते मनगट या भागावर ‘लॅपटॉप’वरील चंदेरी ‘स्टिकर’चे प्रतिबिंब ‘ॐ’च्या रूपात पडलेले दिसले. तेव्हा त्याची छायाचित्रे काढण्यात आली. या ‘ॐ’चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष ‘स्टिकर’वर तो दिसत नाही; मात्र ‘स्टिकर’वर प्रकाश पडला की, तो प्रकाश आपला हात, भ्रमणभाष, असे अन्य कोणत्याही वस्तूवर ‘ॐ’च्या रूपातच प्रतिबिंबित होतो. यावरून लक्षात येते की, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ईश्‍वरी ज्ञान ग्रहण करण्याची सेवा दीर्घकाळ केलेल्या त्या भ्रमणसंगणकात ‘ॐ’काराचे तत्त्व आले आहे. ईश्‍वरी ज्ञान ग्रहण करणे, ही शब्दब्रह्माची साधना आहे. शब्दही शेवटी ‘ॐ’कारातच विलीन होतात. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हाताच्या तळव्याचा सातत्याने स्पर्श होऊन लॅपटॉपवरील त्या स्थानातील ‘ॐ’काराच्या तत्त्वाला जागृती येऊन ते तत्त्व वस्तूंवरील प्रतिबिंबाच्या रूपात प्रकट होत आहे.

‘लॅपटॉप’वरील चंदेरी ‘स्टिकर’वर पडलेल्या प्रकाशाचे प्रतिबिंब ‘ॐ’च्या रूपात उमटण्याचे कारण म्हणजे हा ‘लॅपटॉप’ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या नियमित वापरतात. ‘लॅपटॉप’वर टंकलेखन करतांना त्यांच्या डाव्या हाताचा स्पर्श त्या ‘चंदेरी’ ‘स्टिकर’ला नेहमी होतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली या महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘एक आध्यात्मिक उत्तराधिकारी’ तर आहेतच, शिवाय श्री महालक्ष्मीचा अंशसुद्धा आहेत. यावरून ‘त्या अध्यात्मातील उन्नत आहेत’, हे लक्षात येते. त्यामुळे त्यांच्या स्पर्शामुळे त्या नेहमी सेवेसाठी उपयोगात आणत असलेल्या ‘लॅपटॉप’च्या ‘स्टिकर’ चे प्रतिबिंब ‘ॐ’च्या रूपात पडते. ॐकाराला परिपूर्णत्वाचे लक्षण समजले जाते. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली यांच्यातील परिपूर्णत्वाची ओळख ॐकाराने करवून दिली.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१४.१२.२०२१)

तज्ञ आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांना विनंती !

‘संतांचा देह आणि त्यांच्या वापरातील वस्तू यांतील बुद्धीअगम्य पालटांचा कार्यकारणभाव शोधून काढण्यासाठी साधक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ उपयोगात आणत असलेल्या भ्रमणसंगणकाच्या ‘स्टिकर’वर पडलेल्या प्रकाशाचे प्रतिबिंब ‘ॐ’च्या रूपात उमटण्यामागील काय कारण आहे ?’ या संदर्भात तज्ञ, अभ्यासू, या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे यांचे साहाय्य आम्हाला लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

संपर्क : श्री. रूपेश रेडकर,
ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक