भूतानच्या प्रदेशात चीनकडून गावांची उभारणी !

भूतानचा प्रदेश सैनिकी कारवायांसाठी वापरण्याचा चीनचा नवीन डाव !

भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – भूतानच्या प्रदेशात चीनकडून गावांची उभारणी करण्यात येत आहे. ही गावे सैनिकांसाठी, तसेच नागरिकांना वास्तव्य करता यावे, यासाठी बांधण्यात येत असल्याचे वृत्त आहे. भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमा जेथे एकत्र येतात, तेथून ३० किलोमीटर अंतरावर चीनकडून हे अवैध बांधकाम करण्यात येत आहे. भारतीय सुरक्षायंत्रणांनी उपग्रहाच्या माध्यमातून काढलेल्या छायाचित्रांमुळे  हा खुलासा झाला आहे. वर्ष २०१७ मध्ये डोकलाम येथे भारतीय सैन्य आणि चीनचे सैन्य यांच्यात जवळजवळ ७० दिवस संघर्ष झाला होता. त्यानंतर डोकलाम पठार प्रसिद्धीस आला होता. भारतीय सैन्याने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे चिनी सैन्याला तेथून माघार घ्यावी लागली होती.

१. वर्ष २०१७ मध्ये चीनने डोकलाम येथे त्याच्या सैनिकांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले होते. त्याला भारताने आक्षेप घेतला होता.

२. ‘हा विवादित प्रदेश असल्याने चीन तेथे रस्ता विकसित करण्याचे काम हाती घेऊ शकत नाही’, अशी भूमिका भारताने घेतली होती. त्यावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला होता. ३. याआधी भूताननेही अनेक वेळा त्याच्या भूमीत चिनी घुसखोरीविषयी आक्षेप घेतला होता.