पाकिस्तान सीमेवर ३०० ते ४०० आतंकवादी घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत !

भारतीय सेनेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त सैन्यदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची माहिती

पाकला नष्ट केले, तर आतंकवाद आपोआप संपुष्टात येईल. हे लक्षात घेऊन भारत सरकारने आता भारतीय सैन्याला पाकला संपवण्याची मोकळीक द्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक

सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

देहली – सध्या नियंत्रणरेषेवर मागील वर्षीपेक्षा अधिक चांगली स्थिती आहे; परंतु पाकिस्तान आतंकवाद्यांना आश्रय देण्याच्या त्याच्या सवयीमुळे लाचार आहे. पाकिस्तानच्या सीमेवरील प्रशिक्षण शिबिरांमध्ये अनुमाने ३०० ते ४०० आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत. सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये १४४ आतंकवादी ठार केले आहेत. पाककडून ‘ड्रोन’द्वारे (मानवविरहित हवाईयंत्राद्वारे) शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे प्रयत्नही चालू आहेत, अशी माहिती सैन्यदलप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिली.

भारतीय सैन्याकडून प्रतिवर्षी १५ जानेवारी हा ‘भारतीय सैन्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सैन्याच्या ७४ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने जनरल नरवणे यांनी देशाला शुभेच्छा दिल्या. जनरल नरवणे पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात भारताचे शेजारी देशांशी सहकार्य अधिक वाढले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेमध्ये भारतीय सैन्याचे नेहमीच विशेष योगदान राहिले आहे. आजही भारतीय सैन्याचे ५ सहस्रांहून अधिक सैनिक शांतता टिकवून ठेवण्याच्या (पीस किपिंग) विविध अभियानांसाठी तैनात आहेत. त्यामुळे देशाची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे.