भाजप गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देणार, तर मग आम्ही घरी बसायचे का ? – उत्पल पर्रीकर यांचा भाजपला प्रश्‍न

श्री. उत्पल पर्रीकर

पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – राज्यात सध्या भाजपकडून केले जाणारे राजकारण सहन करणे किंवा स्वीकारणे यांपलीकडचे आहे. यामध्ये पालट झालाच पाहिजे. माझे वडील स्व. मनोहर पर्रीकर यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघातून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देता, तर मग आम्ही घरी बसावे का ?

निवडणूक जिंकण्याची क्षमता, प्रामाणिकपणा आणि चारित्र्य याला काहीच किंमत नाही का ? वेळ आल्यावर मी योग्य तो निर्णय घेईन, असा शब्दांत उत्पल पर्रीकर यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्याला रोखठोक उत्तर दिले.

भाजपचे गोव्यातील निवडणुकीचे प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पणजीतील उमेदवार निवडीसंदर्भात ‘स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र म्हणून उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देता येणार नाही’, असे विधान केले होते. या विधानावरून उत्पल पर्रीकर यांनी हे भाष्य केले.

उत्पल पर्रीकर पुढे म्हणाले, ‘‘पणजी मतदारसंघात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तीला तिकीट दिले जात आहे. गोव्याच्या राजकारणाची जी अधोगती झाली आहे, त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे आणि मला त्याच दृष्टीने काम करायचे आहे. वर्ष १९९४ पासून माझ्या वडिलांसमवेत जे सर्व ज्येष्ठ नेते, तसेच कार्यकर्ते होते, ते माझ्यासमवेत काम करत आहेत.’’