गोवा विधानसभेच्या एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून केला राष्ट्रीय विक्रम !

  • लोकशाहीची लक्तरे टांगायची आणखी काय बाकी राहिली ? हा प्रश्‍नच आहे ! – संपादक 
  • जे स्वार्थासाठी, म्हणजे निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी; म्हणून आपला पक्ष सोडून दुसर्‍या पक्षात जातात, ते केवळ पक्षद्रोहीच नसून राष्ट्रद्रोहीही असतात; कारण ते जनतेची फसवणूक करतात ! – संपादक

पणजी, १३ जानेवारी (वार्ता.) – गोवा विधानसभेच्या गेल्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत एक चतुर्थांश आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन आणि ३ चतुर्थांश आमदारांनी पक्षांतर करून एक राष्ट्रीय विक्रम केला आहे. गोव्यात विधानसभेची निवडणूक व्हायला आणखी एक मासाचा अवधी असल्याने या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गोवा विधानसभेत ४० आमदार आहेत आणि आतापर्यंत ११ आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र देऊन इतर पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे विद्यमान विधानसभेत केवळ २९ आमदारच राहिले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव हे पक्षांतर करणारे एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारकीचे त्यागपत्र न देता पक्षाचा विधीमंडळ गट तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. मागील ५ वर्षांत एकूण २७ आमदारांनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसचे १० आमदार, तर मगोपचे २ आमदार यांनी पक्षांतर केले आहे. आमदार विश्‍वजीत राणे, सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी आमदारकीच्या कारकिर्दीच्या प्रारंभी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचे त्यागपत्र दिले आणि भाजपच्या तिकिटावर पुन्हा पोटनिवडणूक लढवून ती जिंकली. विधानसभेचा कार्यकाळ संपत आलेला असतांना ज्या ११ आमदारांनी आमदारकीचे त्यागपत्र दिले, त्यांमधील चौघांनी भाजपमध्ये, तिघांनी काँग्रेसमध्ये, दोघांनी तृणमूल काँग्रेसमध्ये आणि मगोप अन् आप या पक्षांमध्ये प्रत्येकी एका आमदाराने प्रवेश केला आहे.