मुंबई – येथील कोरोनाची रुग्णसंख्या आता घटतांना दिसत असून परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात राज्याच्या ‘कोविड टास्क फोर्स’चे सदस्य आधुनिक वैद्य अजित देसाई यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.
आधुनिक वैद्य अजित देसाई म्हणाले की, ४ दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईतील दैनंदिन कोरोनाची रुग्णसंख्या २० सहस्रांपेक्षा अधिक होती; परंतु ११ जानेवारीला ११ सहस्र झाली आहे. सरकारने लागू केलेल्या निर्बंधांचा हा परिणाम असून नागरिकही सतर्क झाले आहेत. तसेच कोरोनाची तपासणी १० टक्क्यांनी अल्प झाली आहे. कारण आता लोक घरच्या घरी पडताळणी करून स्वतः विलगीकरण करून घेत आहेत. मुंबई महापालिकेच्या वांद्रे येथील कोविड केंद्रातील ८०० रुग्णांपैकी केवळ ३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.