जगास वेठीस धरणारा हुकूमशहा !

संपादकीय

तिसर्‍या महायुद्धाला तोंड देण्यासाठी भारताने आधुनिक शस्त्रास्त्रांची सिद्धता ठेवणे आवश्यक !

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन

उत्तर कोरियाने जपानी समुद्रात (पूर्व समुद्रात) बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरिया आणि जपान यांनी नुकताच केला. या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही मासांपासून उत्तर कोरियाने शस्त्रसज्ज रहाण्याचा आणि विशेषत: अण्वस्त्रांच्या संदर्भात सक्षम होण्याचा प्रयत्न चालवला आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अधिकृतपणे त्यांच्या सैन्याला यासंदर्भात आदेश दिल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. तेथील जनता अन्नास मोताद असूनही हुकूमशहा मात्र स्वत:च्या हेक्यावरच ठाम आहेत, हेच आताच्या क्षेपणास्त्रे डागल्याच्या घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या हुकूमशहाची एकंदर भूमिका ही जगाची झोप उडवणारी आहे.

उत्तर कोरियामधील अराजक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि किम जोंग उन

वर्चस्ववादाचे एक प्रकारे वेड लागलेल्या किम जोंग उन यांच्यापुढे अमेरिकेसारख्या महासत्तेनेही हात टेकले आहेत. किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना धमकी दिली होती. दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांनी वार्षिक सैनिकी अभ्यास चालू केल्यानंतर उत्तर कोरियाने आक्षेप घेत सैनिकी करार तोडण्याची भाषा केली होती. अमेरिकेकडून उत्तर कोरियाला अण्वस्त्रांच्या चाचण्या थांबवण्याविषयी वारंवार चेतावणी दिली जाते; मात्र उत्तर कोरियाचे हुकूमशहा त्यांना जुमानत नाही. उत्तर कोरियाने जगातील अनेक देशांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे अधिकार गाजवणार्‍या अमेरिकेच्याही नाकी नाऊ आणले आहे. जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ही गोष्ट चिंताजनक आहे. एकिकडे या हुकूमशहाचा उच्छाद चालू आहे, तर दुसरीकडे उत्तर कोरियाची जनता मात्र अत्यंत त्रासलेली आहे. अन्नान्न दशा झालेली तेथील जनता हुकूमशहाच्या अमानवीय हुकूमांना झेलत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरिया येथे एका नेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांवर काही दिवस त्यांच्या दैनंदिन जीवनात हसण्यास अथवा आनंद व्यक्त करण्यास बंदी घालण्यात आली होती. यासह या कालावधीत बाजारातून खरेदी करण्यासही बंदी घालण्यात आली होती. मुलांनी विदेशी चित्रपट पाहिल्यास किंवा विदेशी कपडे परिधान केल्यास पालकांना मृत्यूदंडाची शिक्षा देणार असल्याचा आदेशही काही मासांपूर्वी येथे देण्यात आला होता. उत्तर कोरिया आणि अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया यांच्यात वैर आहे. या देशांचे ‘व्हिडिओ’ एखाद्याकडे आढळले, तर त्यांना मृत्यूदंड देण्यात येणार’, असा हुकूमही उत्तर कोरियामध्ये काढण्यात आला होता. अशा प्रकारे येथील परिस्थिती इतक्या प्रमाणात ताणलेली आहे की, ती केव्हाही तुटू शकते. त्यामुळे येथील नागरिकांचा उद्रेक होऊन पुढे अराजक माजल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मानवाधिकार संघटना गप्प का ?

‘हुकूमशाही’ काय असते ? हे उत्तर कोरियामधील सद्य:स्थिती दर्शवते. भारतात मोदी यांच्या शासनावर हुकूमशाहीचा आरोप करणार्‍यांनी हे लक्षात घ्यायला हवे. खरेतर भारतात पुरोगामी, निधर्मीवादी आणि साम्यवादी त्यांची मते बिनधोकपणे मांडू शकतात, आंदोलने करू शकतात. एवढेच काय भारतात पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा अडवला जातो. त्यांच्या सुरक्षेशीही खेळ केला जातो. पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ‘एल्गार’च्या नावाखाली परिषदा भरवून विद्वेषी गरळओक केली जाते, दंगल घडवली जाते. अशा दोषींवर कारवाईही दिरंगाईने होते. असे गुन्हेगार उजळ माथ्याने फिरतात, उलट त्यांना नेता म्हणून डोक्यावर घेतले जाते. ही हुकूमशाही आहे का ? भारताच्या शेजारचे देश पाकिस्तान आणि चीन हे वारंवार भारताच्या सीमांवर आक्रमणे, घुसखोरी करतात. भारतात अंतर्गत हस्तक पाठवून छुपे युद्ध छेडतात. असे असूनही भारताने कधी मनमानीपणाची भूमिका घेतलेली नाही. भारतात काही देशद्रोही शत्रूराष्ट्रांचे उघड समर्थन करतात, तरीही देशात त्यांना कधी अमानवीय वागणूक दिली जात नाही. यावरून भारतातील शासनावर हुकूमशाहीचा आरोप करणे, हा निवळ द्वेष आहे, हे लक्षात येते.

जगभरातील विशेषत: अमेरिकेतीलही तथाकथित मानवतावादी संघटना भारतातील अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसून भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याच्या बतावण्या करत असतात. त्यांना उत्तर कोरियाचे नागरिक हे मानव वाटत नाहीत का ? तेथील पिचलेल्या नागरिकांसाठी ठामपणे बोलायला अशा संघटना का पुढे येत नाहीत ? लाखो-कोट्यवधी निष्पापांचे प्राण एका हुकूमशहामुळे वेठीस धरले जात असतांना त्याला आवर घालायला जागतिक स्तरावर कुणीच सक्षम नाही का ? उत्तर कोरियाला चीनची फूस आहे. त्यामुळे दोन्ही वर्चस्ववादी देशांपासून संपूर्ण जगाला धोका आहे. याला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी संघटित व्हायला हवे; मात्र येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास प्रत्येकच देश स्वार्थ पहात आहे. एकीकडे महासत्ता म्हणवणारी अमेरिका आतंकवाद, आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांविषयी पोटतिडकीने बोलत असल्याचे भासवते; मात्र दुसरीकडे तिच्या कारवाया सोयीस्कर असतात, हेही आतापर्यंत अनेक वेळा लक्षात आले आहे. थोडक्यात शुद्ध नि:स्वार्थीपणाची किंवा जागतिक शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका कोणता देश घेत आहे, असे सध्या तरी चित्र नाही.

चीन आणि त्याची फूस असलेला उत्तर कोरिया यांच्या जगावर विजय मिळवण्याच्या आसुरी महत्त्वाकांक्षेला आळा बसण्याची सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पुढे तिसरे महायुद्ध अटळ आहे. हे महायुद्ध अण्वस्त्रांनी लढले जाईल, असे अनेक भविष्यवेत्त्यांनी सांगितले आहे. सध्याची स्थितीसुद्धा हेच दर्शवत आहे. त्यामुळे येणार काळ हा भीषण काळ असणार आहे. या स्थितीला तोंड देण्यासाठी भारतालाही आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज रहावे लागणार आहे. अण्वस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रात्रे यांची सिद्धता ठेवणे भारतासाठीही आता आवश्यक नव्हे, अपरिहार्य आहे !