बारामती येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरातील चोरीच्या प्रकरणी एका दिवसात चोरांना अटक !

पती-पत्नी आणि मेव्हणी यांनी राज्यातील २० ते २५ मंदिरांमध्ये चोरी केल्याचे उघड

आरोपी एवढ्या मंदिरांमध्ये चोरी करेपर्यंत पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नाही म्हणजे पोलीस झोपले होते का ? असा प्रश्न पडतो, तसेच मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना घडतात, अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी मात्र नाही. – संपादक 

शिर्सुफळ येथील श्री शिरसाईदेवी मंदिर

बारामती (जिल्हा पुणे) – शिर्सुफळ येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरातील चोरीचा बारामती तालुका पोलिसांनी एका दिवसात शोध घेतला. या प्रकरणी पती-पत्नी आणि मेव्हणी यांना अटक केल्यामुळे राज्यातील २० ते २५ मंदिरांतील चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शाहरूख राजू पठाण, पूजा जयदेव मदनाळ आणि अनिता गोविंद गजाकोश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून शाहरूख पठाण आणि पूजा मदनाळ हे पती-पत्नी आहेत, तर अनिता गजाकोश ही मेव्हणी आहे.

८ जानेवारीच्या रात्री श्री शिरसाईदेवीच्या अंगावरील दागिने आणि मंदिरातील अन्य वस्तू चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी श्रीशिरसाईदेवीच्या मंदिरातील चोरीसह नागपूर, वर्धा, लातूर, बीड, धाराशिव, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील विविध २० ते २५ मंदिरांतील दागिने आणि अन्य साहित्य चोरी केल्याचे मान्य केले. यातील आरोपी शाहरूख पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भोसरी पोलीस ठाणे, समर्थ पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे येथे वाहन चोरीचे गुन्हे नोंद आहेत. (पहिल्याच गुन्ह्यात आरोपीला कठोर शिक्षा केली असती, तर पुढील गुन्हे करण्यास तो धजावलाच नसता. शिक्षापद्धतीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. – संपादक)