श्री महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे आजपासून प्रत्येक घंट्याला ४०० भाविकांनाच दर्शन !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा निर्णय !

श्री महालक्ष्मी मंदिर आणि जोतिबा मंदिर

कोल्हापूर, १० जानेवारी (वार्ता.) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनेनुसार साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात आणि जोतिबा देवाच्या मंदिरात आजपासून प्रत्येक घंट्याला ४०० भाविकांनाच दर्शन मिळणार आहे. मंदिर भाविकांना दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत खुले असून ही सुविधा ‘ऑनलाईन बुकींग’ केलेल्यांनाच मिळणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

श्री. नाईकवाडे पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी प्रत्येक घंट्याला १ सहस्र ५०० असणारा आकडा समितीने काही दिवसांनी १ सहस्र आणि आता तो ४०० पर्यंत खाली आणला आहे. आता दिवसभरात एकूण ६ सहस्र भाविकांना प्रतिदिन दर्शन मिळेल. दर्शन घेतांना एकाच वेळी ५० पेक्षा अधिक भाविक एकत्र येणार नाहीत, याचीही काळजी आम्ही घेत आहोत. एकूणच कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता मंदिर बंद करणे हा पर्याय नाही; मात्र त्यासाठी भाविकांनीही मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे यांसह कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन आम्ही समितीच्या वतीने करत आहोत.’’