कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपिठासाठी न्यायमूर्ती गवई यांचा जाहीर पाठिंबा !
सिंधुदुर्ग – नागरिकांना अल्प वेळेत आणि अल्प खर्चात न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यक आहे. औरंगाबाद खंडपिठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा लाभ अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही येथील अधिवक्ते आणि बार कौन्सिलची मागणी योग्यच आहे. त्यामुळे कोल्हापूर खंडपिठासाठी माझा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना केले.
कोल्हापूर खंडपीठासाठी माझा जाहीर पाठिंबा – न्यायमूर्ती भूषण गवई https://t.co/LHzTN3D8mV
— My Mahanagar (@mymahanagar) January 9, 2022
‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ आणि ‘सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जानेवारी २०२२ या दिवशी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनात जिल्ह्यातील नवोदित अधिवक्त्यांना मार्गदर्शन आणि कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठीचे प्रयत्न या दृष्टीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायाधीश प्रकाश नाईक, सर्वोच्च न्यायालयाचे विशेष सरकारी अधिवक्ता शेखर नाफडे, महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी अधिवक्ता ‘पद्मश्री’ उज्ज्वल निकम, महाराष्ट्र अँड गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता संग्राम देसाई यांच्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांतील, तसेच गोवा राज्यातील अधिवक्ता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायाधीश उपस्थित होते.
या वेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘‘कायद्याने चालणारे राज्य म्हणून आपल्या देशात लोकशाहीचे राज्य आहे; मात्र अस्तित्वात असलेल्या कायद्यांची माहिती जनतेला असत नाही; म्हणूनच पालटते कायदे, पालटत्या संदर्भानुसार कायद्यांचे पालटते अर्थ आणि कायद्यांची संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोचवण्याचे दायित्व देशातील अधिवक्त्यांचे आहे.’’
दुसर्या सत्रात प्रसिद्ध कायदेतज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी नवोदित अधिवक्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उपाख्य अजित नारायण भणगे, अजित पांडुरंग गोगटे, प्रकाश देवराव परब, पहिले शासकीय अधिवक्ता विलास राधाकृष्ण पांगम, सुभाष गोपाळ पणदूरकर आणि प्रकाश शंकर रानडे या सिंधुदुर्गातील ६ जेष्ठ अधिवक्त्यांचा सत्कार करण्यात आला.