मुंबई – उपनगरांतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रतिदिन २० सहस्र नवीन रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सुसज्ज झाली असून मुंबई येथे ९ ठिकाणी ‘जम्बो कोव्हिड केंद्र’ उभारण्यात आली आहेत. असे असले, तरी उपनगरांतील काही खासगी रुग्णालयांतील कोव्हिड बेड पूर्णतः भरलेले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने ही समस्या उद्भवली आहे. महापालिकेच्या कोविड केंद्रात ८० टक्के खाटा रिकाम्या आहेत.
मुंबई येथे आढळणारे अनुमाने ३० टक्के कोरोनाचे रुग्ण हे उच्चभ्रू वसाहतीतील आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कोव्हिड केंद्रात उपचारासाठी न जाता खासगी रुग्णालयांकडे जाऊन उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांनी स्वतःचे ८० टक्के बेड हे कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावेत आणि कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा कडक सूचना महानगरपालिकेने दिल्या आहेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही महानगरपालिकेने दिली आहे.