मिरज – १० जानेवारीपर्यंत मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या सर्व रुग्णांना टप्प्याटप्प्याने घरी पाठवले जाणार आहे. आवश्यक रुग्णांना सांगलीला स्थलांतरित केले जाणार आहे. येथील शासकीय रुग्णालयात १० जानेवारीपासून केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होणार आहेत. या रुग्णालयाचे पुन्हा कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.
डॉ. नणंदकर पुढे म्हणाले, ‘‘आजच्या स्थितीला रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी १३५ व्हेंटिलेटर, तसेच ६५० रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन’ पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. सध्या रुग्णालयात १३५ कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार चालू असून त्यांपैकी ९५ रुग्ण हे मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत.’’