देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक घोषित

७ टप्प्यांत मतदान पहिला टप्पा १४ फेब्रुवारीला

गोव्यात एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला मतदान १० मार्च या दिवशी मतमोजणी

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

नवी देहली – देशातील उत्तराखंड, पंजाब, उत्तरप्रदेश, मणीपूर आणि गोवा या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने देहलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये घोषित केले. या वेळापत्रकानुसार ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. उत्तरप्रदेशमध्ये ७ टप्प्यांत मतदान होणार असून अन्य ४ राज्यांत एकाच टप्प्यात मतदान होईल. सातही टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे. ८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचीही घोषणा या वेळी करण्यात आली.

१. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. यामुळे उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाहिन्या यांवरून प्रचाराच्या वेळी ३ वेळा याविषयीची माहिती द्यावी लागणार आहे.

२. राजकीय पक्षांना त्यांच्या संकेतस्थळांच्या मुखपृष्ठावर (‘होमपेज’वर) प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच याच उमेदवाराला का निवडले ? याचे कारणही पक्षाला स्पष्ट करावे लागणार आहे. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ घंट्यांत ही माहिती द्यावी लागणार आहे.

३. सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ (अत्यावश्यक सेवांमध्ये कार्य बजावणारे कार्यकर्ते) मानले जाईल. त्यांना कोरोना लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) दिली जाईल. मतदान केंद्रावर सॅनिटायझर आदी सर्व व्यवस्था असेल.

४. मतदानाचा कालावधी सर्व ५ राज्यांमध्ये एका घंट्याने वाढवण्यात आला आहे. संपर्कविरहित प्रचार व्हावा, यासाठी दूरदर्शनवर सर्व राजकीय पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी शक्य तेवढा प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शक्यतो प्रत्यक्ष प्रचार टाळावा. यासंदर्भातली सविस्तर नियमावली नंतर जारी करण्यात येईल.

(सौजन्य : Election Commission of India – youtube channel)

१५ जानेवारीपर्यंत ‘रोड शो’, पदयात्रा, फेरी यांना मनाई, तसेच विजय मिरवणूक काढण्यास बंदी

कोणत्याही प्रकारे ‘रोड शो’, पदयात्रा, दुचाकी फेरी आदींना १५ जानेवारीपर्यंत अनुमती दिली जाणार नाही. त्याचप्रकारे राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा गटांना फेरी  काढायला १५ जानेवारीपर्यंत अनुमती नसेल. रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रचारावर बंदी असेल. सार्वजनिक रस्ते, तसेच चौकांमध्ये कोणत्याही कोपरा सभा यांना अनुमती दिली जाणार नाही. विजयानंतर मिरवणूक काढता येणार नाही. तसेच विजयाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी केवळ २ व्यक्तींना अनुमती असेल. उमेदवारासह अधिकाधिक ५ लोकांना घरोघर प्रचार करता येईल. यासंदर्भात प्रतिज्ञापत्रे घेतली जातील. नियमांचे उल्लंघन केल्यास ‘डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅक्ट’, तसेच भारतीय दंड विधान यांनुसार शिक्षा होऊ शकते.


पंजाब, उत्तराखंड आणि गोवा राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान

अर्ज भरण्याचा दिनांक – २८ जानेवारी
अर्ज मागे घेण्याचा दिनांक – ३१ जानेवारी
मतदानाचा दिनांक – १४ फेब्रुवारी
मतमोजणी – १० मार्च


cVIGIL मोबाईल अ‍ॅप

(चित्रावर क्लिक करा)

नागरिकांसाठी cVIGIL (Citizen Vigilant – जागरूक नागरिक) अ‍ॅपची घोषणा करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर जर निवडणूक प्रचार अथवा निवडणुकांच्या कालावधीत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्याचे नागरिकांना लक्षात आले, तर ते त्याची माहिती या अ‍ॅपवर अपलोड करू शकणार आहेत. माहितीसमवेत त्यांना त्या घटनेचे छायाचित्रही अपलोड करायचे आहे. पुढच्या १०० मिनिटांत त्या उल्लंघनाच्या घटनेच्या विरोधात कारवाई केली जाईल.

‘अ‍ॅन्ड्रॉईड’ भ्रमणभाषांसाठी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठीची ‘प्ले स्टोअर’वरील मार्गिका (लिंक)
https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil

______________