काळ्या बाजारात विक्रीसाठी असलेले स्वस्त धान्याचे ८९० गोणी तांदूळ नागपूर पोलिसांकडून जप्त !

२ जणांना कह्यात !

काळाबाजार करणार्‍या समाजद्रोह्यांना कठोरात कठोर शिक्षा तत्परतेने व्हायला हवी ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

नागपूर – शासनाकडून समाजातील गरीब कुटुंबासाठी दिल्या जाणार्‍या स्वस्त धान्याच्या काळाबाजाराचा भांडाफोड येथील पोलिसांनी केला आहे. दिघोरी भागात एका गोदामावर पोलिसांनी ६ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता धाड टाकून तब्ब्ल ८९० गोणी तांदूळ जप्त केला आहे. या गोदामात एकूण ४४५ क्विंटल तांदूळ साठवून ठेवला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या ८ मासांपासून सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याची काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री चालू असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी गोदाम भाड्यावर घेणारे अमोल लांबाडे आणि कासीम या व्यक्तींना कह्यात घेतले आहे.

हा तांदूळ कोरोनाच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून अंत्योदय आणि प्राधान्य गट श्रेणीतील कुटुंबांना २ रुपये किलो दराने देण्यात येत होता. हाच तांदूळ वाड्या वस्त्यांमध्ये फिरून लोकांकडून प्रतिकिलो ८ ते १० रुपये दराने खरेदी केला जात होता. पुढे हा तांदूळ गोंदिया जिल्ह्यातील एका ‘राईस मिल’मधून ‘पॉलिश’ करून घेतला जात असे.

या वेळी त्यात काही प्रमाणात चांगला तांदूळ मिसळून नंतर तो तांदूळ मोठ्या मॉलमध्ये १७ ते २० रुपये किलो दराने विकण्यासाठी पाठवला जात असे, अशी माहिती पोलीस अन्वेषणातून पुढे आली आहे. यासमवेतच ‘फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये येणार्‍या ट्रक्समधील धान्य तेथील कर्मचार्‍यांच्या साहाय्याने चोरले जात असल्याचे उघड झाले आहे. या टोळीने आतापर्यंत सहस्रो क्विंटल तांदुळाची अशा पद्धतीने काळ्या बाजारात विक्री केली आहे.