एक वर्षापूर्वी खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान मोदी यांना ठार करण्याच्या बनवलेल्या व्हिडिओ प्रमाणेच पंजाबमधील मोदी यांच्या रस्ताबंदची घटना !

यावरून खलिस्तानवादी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करू पहात आहेत, हे स्पष्ट आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

खलिस्तानवाद्यांकडून मोदी यांची हत्या करण्यात आल्याच्या ‘अ‍ॅनिमिटेड’ व्हिडिओमधील दृश्य

नवी देहली – पंजाबच्या फिरोजपूर येथे ५ जानेवारी २०२२ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी उड्डाणपुलावर २० मिनिटे रोखला होता. यामुळे पंतप्रधान मोदी यांना पुढचा प्रवास करण्याऐवजी मागे फिरावे लागले होते. या प्रकारावरून ‘पंतप्रधान मोदी यांची खलिस्तानवाद्यांकडून हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता’, असा आरोप करण्यात येत असतांना गेल्या वर्षी खलिस्तानवाद्यांकडून मोदी यांची हत्या करण्यात आल्याचा एक ‘अ‍ॅनिमिटेड’ (व्यंगचित्रात्मक) व्हिडिओ समोर आला आहे. भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये खलिस्तानवादी पंतप्रधान मोदी यांना चारी बाजूंनी घेरून नंतर उड्डाणपुलावरून खाली फेकत आहेत, असे दाखवले आहे.

१. हा व्हिडिओ १ डिसेंबर २०२० या दिवशी खलिस्तानी संघटनेकडून यू ट्यूब चॅनल ‘धक्का गेमिंग’वर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एका बाजूने पंतप्रधान मोदी यांची गाडी सुरक्षारक्षकांसह येत असते, तर समोरून शेतकरी ट्रॅक्टरवरून येतात आणि ते पंतप्रधान मोदी यांची गाडी रोखतात. त्यामुळे मोदी गाडीतून बाहेर येतात. त्याच वेळी आंदोलक मोदी यांच्या दिशेने धावत येतात. हे पाहून मोदी दुसरीकडे पळण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा एक ट्रॅक्टर त्यांचा मार्ग रोखतो. तेथूनही ते पळण्याचा प्रयत्न करतात; मात्र आंदोलक त्यांना रोखतात. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या असतात. त्यानंतर आंदोलक मोदी यांना पकडून त्यांचे पाय बांधून त्यांना उड्डाणपुरावरून खाली फेकतात, असे दाखवण्यात आले आहे.

२. दुसरीकडे बंदी घातलेली खलिस्तानवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’चा संस्थापक गुरपतवंतसिंह पन्नू याने एका व्हिडिओद्वारे धमकी दिली आहे की, मोदी यांच्या दौर्‍यातील घटना ही पंजाबच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने उचललेले पुढचे पाऊल आहे.