पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा ! – डॉ. संभाजी खराट, उपसंचालक, माहिती कार्यालय, कोल्हापूर विभाग 

मिरजेला पत्रकारदिन उत्साहात पार पडला

डॉ. संभाजी खराट

सांगली, ६ जानेवारी (वार्ता.) – चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यांसाठी पत्रकारांनी समाजातील दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे. बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेचा आदर्श घेऊन पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे माहिती कार्यालय उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले. ‘ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर असोसिएशन’च्या वतीने मिरज येथे ६ जानेवारी या पत्रकारदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

सांगली जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी उपस्थितांना पत्रकारदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजात घडणार्‍या घटना, सत्य, वास्तव आणि तथ्य या प्रत्येक गोष्टीतील तफावत समजावून घेण्याची कुवत ही पत्रकारितेने निर्माण केली असल्याचे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सागर बोराडे होते. प्रारंभी श्री. दीपक ढवळे यांनी स्वागत केले, तर श्री. राहुल मोरे यांनी आभार मानले. या वेळी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन, पत्रकार, छायाचित्रकार, संघटनेचे पदधिकारी उपस्थित होते.