प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी घेतलेली अनोखी भेट !

म्हापसा, गोवा येथील प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे यांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी घेतलेली अनोखी भेट अन् त्यांना प.पू. आजींमधील उत्कट भावाचे घडलेले दर्शन !

प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे

‘काही मासांपूर्वी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी म्हापसा, गोवा येथील प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी (वय ८३ वर्षे) यांची भेट घेतली. भेटीपूर्वी आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सद्गुरु, तसेच संत यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

१. प.पू. आपटेआजींच्या भेटीपूर्वी

१ अ. प.पू. आपटेआजी यांना भेटून त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा देवाने पूर्ण करणे : ‘प.पू. आपटेआजींना भेटून त्यांचे दर्शन घ्यावे’, असे मला बर्‍याच दिवसांपासून वाटत होते. सतत सेवेनिमित्त दौर्‍यावर असल्याने त्यांच्या भेटीचा योग जुळून येणे कठीण होते. गेल्या काही दिवसांपासून मी रामनाथी आश्रमातच असल्याने हा योग देवानेच जुळवून आणला. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंनाही प.पू. आजींना भेटण्याचे मनात होते. आम्ही दोघी एकाच वेळी आश्रमात असणे आणि आमच्या दोघींचीही आपटेआजींशी भेट होणे, हे दैवी नियोजनच होते. आजींचे आम्हा सर्वांवर एवढे प्रेम आहे की, देवालाच ही भेट जुळवून आणावी लागली.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१ आ. ‘सद्गुरुद्वयींना फराळाचे कोणते पदार्थ आवडतात ?’, हे अगोदरच विचारून घेणार्‍या आणि ‘दोघींना मन भरून पहायचे आहे’, असे सांगणार्‍या प.पू. आजी ! : ‘आम्ही भेटण्यासाठी घरी येणार; म्हणून प.पू. आजींनी अगोदरच भ्रमणभाष करून ‘तुम्हाला कोणते पदार्थ आवडतात ? तुमच्यासाठी काय फराळ बनवू ?’, असे आपुलकीने विचारले. तेव्हा आम्ही त्यांना कळवले, ‘‘आजी, तुमच्या भेटीनेच आमचे पोट भरून जाईल. तुमच्या भेटीचा आनंद आणि तुमचा कृपाशीर्वादच आम्हाला हवा आहे.’’ त्या वेळी आजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही आलात की, मी तुम्हाला लगेच जाऊ देणार नाही. अगदी मन भरून तुम्हा दोघींना पहाणार आणि तुमच्याशी गप्पा-गोष्टी करणार आहे.’’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. प.पू. (श्रीमती) सुशीला आपटे २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ४. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ५. श्री. प्रकाश आपटे (प.पू. आजींचे पुत्र) ६. श्री. प्रणव आपटे (नातू) ७. सौ. प्रणिता आपटे (स्नुषा)

२. सद्गुरुद्वयी आणि प.पू. आजी यांची अविस्मरणीय भावभेट !

२ अ. प.पू. आजींनी आलिंगन दिल्यावर पूर्वीच्या प्रसंगाचे स्मरण होऊन प.पू. आजी, प.पू. आपटे गुरुजी आणि भगवान परशुराम हे तिघे एकच असल्याचे जाणवणे : ‘आम्ही प.पू. आजींच्या घरी गेलो, तेव्हा त्या आमची वाट पहातच बसल्या होत्या. प.पू. आजींना पाहून पुष्कळ उत्साह आणि आनंद जाणवत होता. त्यांचा तोंडवळा अत्यंत तेजस्वी वाटत होता. त्यांनी आम्हाला आलिंगन दिले, तेव्हा मला पुढील प्रसंग आठवला, ‘८ – ९ वर्षांपूर्वी आम्ही काही साधक भगवान परशुरामांची दीक्षा लाभलेले अग्निहोत्री उपासक प.पू. आपटे गुरुजींना (प.पू. आजींच्या यजमानांना) भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा प.पू. दादांशी (त्यांना सगळे ‘दादा’ म्हणत असत.) माझी दैवी भेट झाली होती.’

आज प.पू. आजींनी आम्हा दोघींना दिलेले हे आलिंगन, म्हणजे ‘परशुरामांनी सनातन संस्था आणि साधक यांना आपत्काळामध्ये दिलेले संरक्षककवच आहे’, असे वाटले. या अनुभूतीतून देवाने मला प.पू. आजी, प.पू. आपटेगुरुजी आणि भगवान परशुराम हे तिघे एकच असल्याचे लक्षात आणून दिले. माऊलीचे हे आलिंगन आमच्या सदैव स्मरणात राहील !

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ आ. काही वर्षांपूर्वी प.पू. आपटेगुरुजींनी ‘आजींची मुलाखत केव्हा घेणार ?’, असे विचारणे, त्यांच्या बोलण्यामागील गर्भितार्थ आता लक्षात येणे : काही वर्षांपूर्वी मी आपटे आजींच्या घरी गेले होते. तेव्हा मला त्यांच्याविषयी विशेष काही ठाऊक नव्हते. आजींशी भेट झाल्यावर प.पू. दादा मला म्हणाले, ‘‘तुम्ही माझी मुलाखत घेतली. हिची (प.पू. आजींची) मुलाखत केव्हा घेणार ?’’ प.पू. दादांना भविष्यातील सर्वकाही ठाऊक होते. ‘त्यांच्यानंतर आजींनाच सर्व कार्यभार सांभाळायचा आहे’, हे त्यांनी अगोदरच जाणले होते. त्यांच्या बोलण्याचा गर्भितार्थ मला आज लक्षात आला. प.पू. दादांच्या देहत्यागानंतर आजींच्या चैतन्याला जागृती आली, म्हणजेच त्यांचे कार्य चालू झाले.’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ इ. सद्गुरुद्वयींच्या आगमनानंतर भावविभोर होणार्‍या आणि स्वतः खाली भूमीवर बसणार्‍या आजींचा दास्यभाव ! : ‘आम्हा दोघींना आसंदीवर बसवून आजी स्वतः मात्र खाली भूमीवर बसल्या. आम्ही त्यांना पुष्कळ विनवणी केल्यावर त्या शेजारी आसंदीवर बसल्या. त्या म्हणाल्या, ‘‘आज तुम्ही २ देवीच घरी आला आहात आणि तुमच्या माध्यमातून माझे परम पूज्यच आले आहेत; म्हणून मी खालीच बसले, परम पूज्यांच्या चरणांपाशी ! तुम्हा सर्वांना पाहून मला पुष्कळ आनंद झाला. आता घर भरल्यासारखे वाटत आहे. आता काही शेष उरले नाही. एकदा मी सर्व साधकांना बसमध्ये बसवून येथे घरी आणणार आहे.’’ यातून आजींचे सनातनच्या साधकांवर असलेले अतीव प्रेम आणि उच्च आध्यात्मिक स्थितीमध्येही असलेला त्यांचा सहजभाव दिसून आला.

२ ई. निरपेक्ष प्रीतीने सर्वांना आपलेसे करणार्‍या प.पू. आजी !

२ ई १. आजींनी स्वतःच्या हाताने साधकांना खाऊ देणे : आजींनी त्यांच्या सुनेकडून आमच्यासाठी फराळ बनवून घेतला होता. आजींनी आलेल्या प्रत्येक साधकाला स्वतःच्या हाताने प्रेमाने खाऊ दिला. आजींचा प्रेमभाव त्यांच्या घरी गेल्यावर प्रत्येक वेळी अनुभवायला येतो. घरी आलेल्या सर्वांना त्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम देतात आणि आपलेसे करतात. या वयातही आजी त्यांच्या सुनेला स्वयंपाकात साहाय्य करतात, हे विशेष आहे. या भेटीत आम्ही पू. आजींचा बालकासम निरागस भाव अन् मातेसम वात्सल्य भाव एकाच वेळी अनुभवला.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

२ ई २. आजींच्या आपलेपणामुळे ‘त्यांच्या घरून निघू नये’, असे वाटणे : ‘आजींनी सर्वांना त्यांच्या प्रेमभावाने जोडले आहे. आजींच्या प्रीतीमुळे त्या गुरुदेवांशी जोडल्या गेल्या आहेत. कुणी घरी आल्यास आजींना पुष्कळ आनंद होतो. त्यांच्यातील आपलेपणामुळे ‘त्यांच्या घरून निघू नये’, असे वाटते. ‘आपल्यातील भक्तीभावामुळे ईश्वर कसा आपलासा होतो ?’, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प.पू. आजी !’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

२ उ. आजींची उत्तम स्मरणशक्ती !

१. प.पू. आजींची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. मला पाहून प.पू. आजी म्हणाल्या, ‘‘वर्ष २०१८ मध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही मला भेटण्यासाठी आला होतात.’’ या वयातही आजींना २ वर्षांपूर्वी मी त्यांच्या घरी गेल्याची तिथी आठवत असल्याचे पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले. एका साधकाची ओळख करून दिल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘मी याला ओळखते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये याचे लिखाण प्रसिद्ध होते.’’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२. ‘आजींनी भेटीच्या वेळी आम्हाला काही भजने, वेदमंत्र आदी सहज म्हणून दाखवले. त्यांची स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे त्यांना भजने आदींचे शब्द अचूक लक्षात आहेत.

२ ऊ. बिकट परिस्थितीतही आनंदावस्था अनुभवणार्‍या आजी ! : ‘साधी रहाणी, उच्च विचारसरणी’ याप्रमाणे जीवन जगत असलेल्या प.पू. आजी पुष्कळ साध्या आहेत. त्या जेथे रहातात, ती साधी पत्र्याची वास्तू आहे. या बिकट परिस्थितीचा प.पू. आजींच्या साधनेवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांची आनंदावस्था चिरंतन राहिली आहे. कलियुगामध्ये संतांना अशा स्थितीत पाहून ‘काळ किती वाईट आहे ?’, याची जाणीव झाली.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उत्कट भाव असलेल्या प.पू. आजी !

२ ए १. भोळा भाव : भेटीच्या वेळी आम्ही प.पू. आजींना छायाचित्रकात (कॅमेर्‍यामध्ये) असलेले गुरुदेवांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा त्यांनी गुरुदेवांना भावपूर्ण नमस्कार केला आणि छायाचित्रकाच्या काचेमधून दिसणार्‍या गुरुदेवांच्या गालावरून प्रेमाने हळूवार हात फिरवला. आजींचा तो भोळा भाव पाहून आमची भावजागृती झाली.

२ ए २. गुरुदेवांची आठवण आल्यास ग्रंथांतील त्यांची छायाचित्रे पहाणार्‍या आजी ! : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काही अनुभूती येतात का ?’, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘परम पूज्य सतत माझ्यासह आहेत. कधी ते मला दिव्य प्रकाशाच्या रूपात, तर कधी भगवान श्रीकृष्णाच्या रूपात दिसतात. ते दृष्टांताद्वारे मला प्रत्यक्ष दिसतात. माणसांप्रमाणे तेही माझ्याशी बोलतात. मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण आल्यास मी ‘छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील त्यांची छायाचित्रे पहाते. ती पाहून मला पुष्कळ आनंद होतो. आता वयोमानाप्रमाणे बाहेर जाणे जमत नसल्याने मला आश्रमात येणेही कठीण होते; पण गुरुदेवांचे माझ्यावर केवढे प्रेम आहे ना ? त्यामुळेच त्यांची दोन रूपे असलेल्या तुम्ही दोघी देवी आज मला भेटायला स्वतः आला आहात.’’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२ ए ३. सद्गुरुद्वयींच्या पाद्यपूजेच्या वेळी अनुभवलेली प.पू. आजींची भावावस्था ! : ‘प.पू. आजींनी सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाकू यांची पाद्यपूजा केली. त्या वेळी ‘त्यांना सद्गुरु ताईंच्या चरणांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे चरण दिसत आहेत’, असे नंतर त्यांनी सांगितले. पाद्यपूजा करतांना आजींची पुष्कळ भावजागृती होत असल्याचे जाणवत होते.’ – एक साधक

२ ऐ. आजींच्या घरी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ ऐ १. त्रेतायुगाप्रमाणे वातावरण जाणवणे : ‘त्रेतायुगात यज्ञसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व होते. प.पू. आजींच्या घरी गेल्यावर मी त्रेतायुगातील वातावरण अनुभवले. तेथे मला सूक्ष्मातून दैवी मंत्रोच्चार ऐकू येत होते. त्यामुळे माझे मन निर्विचार होऊन ध्यान लागत होते.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ ऐ २. प.पू. आजींच्या चैतन्यामुळे त्यांची वास्तू सात्त्विक आणि पावन झाली असणे : ‘आजी रहात असलेल्या वास्तूमध्ये अग्नीचा एक वेगळाच दैवी सुगंध येतो. आजींकडे जाणारा प्रत्येक जण त्या चैतन्यमय सुगंधामध्ये न्हाऊन जातो. तिथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे स्वतः अग्नीच शुद्धीकरण करतो. आजींच्या घरात पुष्कळ सात्त्विकता आणि थंडावा जाणवतो, तसेच आजींच्या मायेचा ओलावाही अनुभवता येतो. आजींच्या वास्तव्याने आणि नित्य अग्निहोत्र उपासनेने ही वास्तू पावन झाली आहे.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

३. प.पू. आजींनी भेटीच्या वेळी गायलेली सुंदर भजने

प.पू. आजींप्रमाणेच त्यांचा आवाजही मधुर आहे. आमच्याशी बोलत असतांना मध्येच आजी निरागस लहान बाळासारखे भजन गात होत्या. त्यांनी सुरेल गायलेल्या या भजनांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेल्या त्यांच्या अपार भावाचे दर्शन घडले. आजींनी गायलेली भजने पुढे दिली आहेत.

३ अ. गुरु येथे रहाती ।

सनातन हे क्षेत्र मनोहर, संतांची वसती ।
गुरु येथे रहाती, सनातन गुरु येथे रहाती ।। धृ. ।।

प्रसन्न शांती तेज मुखावर, सुवर्ण कांती दिसे सुंदर ।
वरदहस्त तो असे सदोदित, साधकांवरती…गुरु येथे रहाती ।। १ ।।

अगाध महिमा, अगम्य लीला, वेद येथे अबोल ठरला ।
चरणी त्यांच्या नमवूनी माथा, घेऊ शरणागती….हो, गुरु येथे रहाती ।। २ ।।

जो या चरणी विनम्र झाला, गुरुभक्तीने विरूनी गेला ।
दोषही त्यांचे घेऊनी पदरी, स्नेहाने रहाती…गुरु येथे रहाती ।।३।।

(हे मूळ भजन अक्कलकोटचे परम सद्गुरु गजानन महाराज यांच्या भजन संग्रहातील आहे.

प.पू. आजींनी मूळ भजनात काही पालट करून वरील भजन रचले आहे.)

३ आ. तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायासी ।

माती सांगे कुंभाराला…पायी मज तुडवीसी,
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायासी…रे माझ्या पायासी ।। १ ।।

गर्वाने का ताठ रहासी, भाग्य कशाला उगा नाचविसी,
तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी ।। २ ।।

वीर धुरंदर आले गेले, पायी माझ्या इथे झोपले,
कुब्जा आठवा मोहक युवती, अंती मजपाशी ।। ३ ।।

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायासी…रे माझ्या पायासी ।।

४. आजींचा निरोप घेतांना अनुभवलेली त्यांची अवर्णनीय भावावस्था !

‘आम्ही त्यांच्या घरून निघण्यासाठी घराबाहेर पडत असतांना आजींनी मला थांबवले. माझे दोन्ही हात पकडून त्यांनी मला जवळ घेतले. तेव्हा त्या माझ्या डोळ्यांत पहात होत्या. त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसलेल्या भावाचे शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. नंतर मी त्यांना म्हटले, ‘‘आजी, कुटुंबियांची काळजी करू नका.’’ तेव्हा त्यांनी ‘लोभ असावा’, असे म्हणून मला नमस्कार केला.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

प.पू. आपटेआजींचा साधकांना संदेश

‘आता कोणत्याही मायेच्या गोष्टीत न अडकता साधनेमध्ये पुढे जा. ‘आशा करावी परमेश्वराची, करू नये त्या व्यर्थ नराची !’

‘प.पू. आजी, श्री गुरूंच्या कृपेमुळे आपल्यासारख्या संतांचे दर्शन होऊन आम्हा साधकांना आपला कृपाशीर्वाद लाभत आहे. यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. आपटेआजी यांच्यातील अलौकिक आध्यात्मिक नाते !

परात्पर गुरुदेवांची प.पू. आजींप्रती अतीव प्रीती आहे. ते नेहमी प.पू. आजींची आठवण काढतात आणि त्यांची वेळोवेळी विचारपूसही करतात. प.पू. आजी आश्रमात आल्यावर प्रकृती अस्वास्थ्य असतांनाही ते आजींना आवर्जून भेटतात. श्रीकृष्ण आणि सुभद्रा यांना आपण प्रत्यक्षात पाहिले नाही; पण गुरुदेव आणि प.पू. आजी यांची भेट म्हणजे ‘श्रीकृष्ण-सुभद्रा’ या बंधु-भगिनीच्या प्रेमसोहळ्याचे दर्शनच असते. या भेटीमध्ये प.पू. आजी पूर्ण वेळ गुरुदेवांच्या चरणांशीच बसून असतात. ‘श्रीकृष्णाची सुभद्रा जशी बहीण होती, तशा तुम्ही आहात’, असे म्हटल्यावर आजी लगेचच म्हणाल्या, ‘‘परम पूज्यही मला त्यांची बहीणच मानतात.’’ – एक साधक

प.पू. आजींचे सात्त्विक आणि प्रेमळ कुटुंब !

१. पुत्र – श्री. प्रकाश आपटे

प.पू. आजी त्यांचे पुत्र श्री. प्रकाश महादेव आपटे यांच्यासह रहातात. प.पू. दादांनंतर गजानन महाराजांच्या कृपेने लाभलेल्या अग्निहोत्राची सेवा श्री. प्रकाश आपटे आजपर्यंत अविरतपणे आणि संपूर्ण श्रद्धेने करत आहेत. त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शनही या भेटीवेळी लाभले.

२. स्नुषा – सौ. प्रणिता आपटे

२ अ. आजींची भावपूर्ण सेवा करणारी त्यांची स्नुषा ! : आजींची सर्व सेवा त्यांची स्नुषा सौ. प्रणिता प्रकाश आपटे या भावपूर्ण रितीने करतात. त्यांच्या सत्संगामुळे त्यांच्या सुनेमध्येही चांगले परिवर्तन झाले आहे. आजींना काहीही लागले, सवरले, तर सर्व सौ. प्रणिताकाकू पहातात. काकू प.पू. आजींची सेवा इतकी मनापासून करतात की, ते पाहून ‘त्या सून नसून आजींची कन्याच आहेत’, असे वाटते.

२ आ. प.पू. आजींनी सुनेला दिलेला आशीर्वाद ! : सौ. प्रणिता आपटे यांच्या भावपूर्ण सेवेमुळे प्रसन्न होऊन प.पू. आजींनी त्यांना आशीर्वाद दिला, ‘तू काळजी करू नकोस. तुझ्यासाठी परम पूज्य आणि या सद्गुरुद्वयी आहेत. तुझ्यावर त्यांच्या कृपेचे छत्र सदैव राहील. माझी सेवा करून तू अध्यात्मात बरेच काही कमावले आहेस. त्यामुळे संसारातील गोष्टींची चिंता न करता सर्वकाही देवावर सोडून दे.’

३. आजींचा नातू, नात आणि पणतू

श्री. प्रकाश आपटे यांचा मुलगा श्री. प्रणव आपटे, तसेच त्यांची कनिष्ठ कन्या सौ. प्रचीती, तिचे यजमान श्री. अविनाश अच्युत योगी अन् त्यांचा मुलगा चि. समीहन योगी (आजींचा पणतू) या सर्वांचीही भेट घडली.

प.पू. आजींच्या कुटुंबातील सर्व जण आजींप्रमाणेच पुष्कळ प्रेमळ आणि आपुलकीने वागणारे आहेत. – एक साधक

या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक