उर्दूच्या पाठ्यपुस्तकात मात्र हिंदूंच्या सणांची माहिती देणारा धडा नाही !
|
(टीप : ‘ईदगाह’ म्हणजे ईदच्या दिवशी नमाजपठण करण्याची जागा)
मुंबई, ६ जानेवारी (वार्ता.) – ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळा’च्या अर्थात् बालभारतीच्या इयत्ता ४ थीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ नावाच्या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालभारतीचे ‘उर्दू’ भाषेसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक असून त्यात मात्र हिंदूंचे सण, उत्सव, प्रार्थना आदींविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
१. इदगाहची कथा प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या ‘उर्दू’ कथांमधून घेण्यात आली आहे. ‘एका अनाथ आणि गरीब मुसलमान बालक ईदच्या दिवशी ईदगाहच्या ठिकाणी जातो आणि स्वत:साठी खेळणी, खाऊ खरेदी न करता स्वत:च्या वृद्ध आजीसाठी भाकरी भाजण्याचा चिमटा खरेदी करतो’, अशी ही कथा आहे. यामध्ये ईदगाहच्या ठिकाणी करण्यात येणारे नमाजपठण आणि त्याचे थोडक्यात वर्णन देण्यात आले आहे.
२. प्रेमचंद यांच्या बोधपर कथांपैकी ही एक आहे; मात्र यामध्ये इस्लामविषयीच्या माहिती असल्यामुळे खरेतर ‘या पाठाचा समावेश बालभारतीला ‘उर्दू’च्या पाठ्यपुस्तकात करता आला असता. तसे करण्याऐवजी बालभारतीने या धड्याचा समावेश बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात का केला आहे ?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३. यापूर्वी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेनेही (‘एन्.सी.ई.आर्.टी.’नेही) इयत्ता ७ वीच्या ‘हमारे अतीत-२’ या इतिहासाच्या पुस्तकात भारतावर आक्रमणकर्त्या मोगलांचा इतिहास देऊन मोगलांना ‘भारतियांचे पूर्वज’ दाखवण्याचा प्रयत्न केला होता. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाची हीच परंपरा आता बालभारतीही गिरवत असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात ‘असे’ होतेय शिक्षणाचे इस्लामीकरण!https://t.co/74yIf6EuYK@RSSorg @VHPDigital @BajrangdalOrg#islamic #maharashtra #stateboard #4thstanderd #childrens
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 5, 2022
बालभारतीचा हा प्रकार जाणीवपूर्वकच !
बालभारतीने हे जाणीवपूर्वक केलेले नाही, असे कुणाला वाटेल; मात्र यापूर्वीचे बालभारतीचे उद्योग पहाता केवळ मुसलमानांच्या लांगूनचालनासाठी आणि सर्वधर्मसमभावाची टिमकी मिरवण्यासाठीच हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचे स्पष्ट होईल. यापूर्वी बालभारतीच्या इयत्ता ४ थीच्या ‘शिवछत्रपती’ या पाठ्यपुस्तकातील ‘अफजलखानाचा वध’ या धड्यातील छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा काढतांनाचे चित्र होते; मात्र ‘मुसलमानांच्या भावना दुखावतील’ म्हणून बालभारतीने हे चित्र पालटले. या चित्राऐवजी ‘छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाची भेट घेत असल्या’चे चित्र सध्या या पुस्तकात छापण्यात आले आहे. मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून बालभारतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि खरा इतिहासही दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पाठ्यपुस्तकामध्ये ‘ईदगाह’ या धड्याचा समावेश हा मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी असल्याचे स्पष्ट होते.
…मग बालभारतीच्या ‘उर्दू’ पाठ्यपुस्तकात हिंदूंच्या उत्सवाची माहिती देणारा धडा का नाही ?
‘बालभारतीने मराठीच्या पाठ्यपुस्तकात ‘ईदगाह’ या धड्याचा समावेश करून सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपक्षेता दाखवण्याचा जर प्रयत्न केला असेल, तर मग इयत्ता ४ थीच्या उर्दूच्या पाठ्यपुस्तकातही हिंदूंचे सण किंवा प्रार्थना यांचा समावेश करणे अपेक्षित होते; मात्र बालभारतीने तसे केलेले नाही. इतकेच काय तर बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातही बालभारतीने हिंदूंच्या सणांची माहिती दिलेली नाही. यातून ‘बालभारतीला सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंना शिकवायचा आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित होतो.
बालभारतीचा खुलासा
बालभारतीने या संदर्भात खुलासा करणारे पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात म्हटले आहे की, या पाठातून कोणत्याही धर्माचा प्रसार करण्याचा हेतू नसल्याने या संदर्भात कोणताही विपर्यास करण्यात येऊ नये.