विलगीकरणाच्या कालावधीत पालट
मुंबई – सध्या दळणवळण बंदीची आवश्यकता नाही; परंतु रुग्णसंख्या पाहून आणखी निर्बंध लावणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नवीन निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्य वेळी निर्णय घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संसर्गाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देतांना राजेश टोपे बोलत होते.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, ३ दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची गोष्ट आहे. त्यातील ९० टक्के लोकांना लक्षणे नाहीत. उर्वरित १० टक्क्यांमध्ये १-२ टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी भरती होत आहेत.
राज्यात गृहविलगीकरणाचा कालावधी १० दिवसांचा होता, तो आता ७ दिवस करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक आहे.
अँटिजेन चाचणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी ‘बुथ’ उभारण्यात येणार आहेत. अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आल्यास आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
सध्याच्या नियमांप्रमाणे ‘बुस्टर डोस’ शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहेत; मात्र खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचार्यांना ‘बुस्टर डोस’ त्यांच्याच रुग्णालयात देण्यास अनुमती देण्यात आली आहे.
ज्यांची लस झालेली नाही, त्यांना ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत समजावणार असल्याची चेतावणी राजेश टोपे यांनी दिली आहे.