मुंबई, ५ जानेवारी (वार्ता.) – शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जलदगतीने होत आहे. ‘ओमिक्रॉन’चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमट्रिक’ यंत्रणा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी ५ जानेवारी या दिवशी शासनाने आदेश काढला आहे. (मंत्रालय आणि राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये उपस्थिती नोंदणीसाठी ‘बायोमेट्रिक’ यंत्रणेचा उपयोग केला जातो.)
नोंदणी करतांना होणारी गर्दी आणि गोंधळ यांमुळे ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. गर्दी टाळण्यासाठी येत्या १५ दिवसांत मंत्रालयाच्या इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर ‘बायोमेट्रिक’ यंत्रणा बसवण्याचा आदेश माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील ११ मंत्र्यांसह ७० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे.