फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

फोंडा (गोवा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

५.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री. प्रताप कापडिया कोरोनामुळे रुग्णाईत असतांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी पाहिले. आज यासंदर्भातील उर्वरित सूत्रे पाहूया.

भाग २ वाचा पुढील मार्गिकेवर : https://sanatanprabhat.org/marathi/541196.html

(भाग ३)

श्री. प्रताप कापडिया

८. आलेल्या अनुभूती

८ अ. स्वतःच्या मागच्या ‘स्क्रीन’मधून येणार्‍या ‘पी..प, पी…प’, या आवाजातून ‘आम्ही बघत आहोत ना !’, असा संदेश ऐकू येणे आणि ‘परात्पर गुरुमाऊलीच हा संदेश देत आहे’, असे जाणवणे : ‘मी ५ दिवस अतीदक्षता विभागात होतो. त्या वेळी तेथे ६ पलंग होते. त्या प्रत्येक पलंगाच्या मागे ‘स्क्रीन’ (टीप) लावले होते. माझ्यामागेही एक ‘स्क्रीन’ होता. मी ‘माझ्या ‘स्क्रीन’वर काय माहिती लिहिली आहे ?’, हे वाचण्यासाठी मागे वळून पहात होतो. तेव्हा मला मागून आवाज आला, ‘मागे बघतोस ?’ त्या वेळी मी परत मागे पाहिले; मात्र मला तेथे कुणीही दिसले नाही. मला ज्या दिशेकडून आवाज आल्यासारखे वाटले, तेथे पाहिल्यावर मला दिसले, ‘तेथील रुग्ण बोलण्याच्या स्थितीत नाही.’ केवळ माझ्या मागच्या ‘स्क्रीन’मधून ‘पी..प, पी…प’, असा आवाज येत होता. ‘त्यातून तो आवाज ऐकू आला’, असे मला वाटले. त्यानंतर पुन्हा त्या स्क्रीनमधून ‘पी..प, पी…प, पी..प, पी…प’, असा आवाज मला ऐकू आला. त्यातून मला ‘आम्ही बघत आहोत ना, म्हणजे आम्हीच तुझा ‘स्क्रीन’ नियंत्रित (‘मॉनिटर’) करत आहोत’, असे ऐकू आले. हा कुणी बोलल्याचा आवाज नसून त्या ‘पी..प, पी…प’, या आवाजाच्या माध्यमातूनच कुणीतरी सांकेतिक भाषेत मला हे सांगत असल्याप्रमाणे वाटले. आधी वाटले, ‘मला भास तर होत नाही ?’; पण असे प्रत्येक घंट्याला त्या ‘स्क्रीन’मधून मला ‘पी..प पी…प’, असे ऐकू येत होते आणि प्रत्येक वेळी त्यातून हे संदेश मिळत होते. मला २४ घंटे असेच जाणवत होते. जणू परात्पर गुरुमाऊलीच मला हे संदेश देत होते. दुसर्‍यांसाठी हे ‘पी..प, पी…प’चे आवाज होते; पण देवाने माझ्यासाठी ‘पी..प, पी…प’, या सांकेतिक भाषेत संदेश पाठवले होते.’ मी अन्य ५ ‘स्क्रीन्स’कडे लक्ष दिले. त्यातूनही ‘पी..प’, असा आवाज येत होता; पण त्यातून कुठलेच संदेश ऐकू येत नव्हते.

टीप – रुग्णालयातील अतीदक्षता विभागात प्रत्येक रुग्णाच्या मागील बाजूस त्या रुग्णाच्या शारीरिक स्थितीची माहिती देणारे एक उपकरण असते. त्यात त्या त्या वेळचे रुग्णाच्या नाडीचे ठोके, त्याचा रक्तदाब, त्याच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी माहिती दिलेली असते. त्या उपकरणातून सतत ‘पी..प, पी…प, असा आवाज येत असतो.’

८ आ. त्या ५ दिवसांत ३ रुग्णांचे माझ्यासमोरच निधन झाले; पण देव माझी काळजी घेत होता; म्हणून मी स्थिर होतो.

८ इ. रामनाथी आश्रमातील प्रसादामुळे बरे वाटणे : देवाच्या कृपेने मला एका साधकाच्या माध्यमातून रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील प्रसादही मिळाला. उज्ज्वल मला तो प्रसाद प्रतिदिन थोडा थोडा देत होता. मला सहाव्या दिवशी अतीदक्षता विभागातून बाहेर आणले.

९. परात्पर गुरु डॉ. आठवले, संत आणि साधक यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता ! : सद्गुरु गाडगीळकाकांनी प्रतिदिन मला नामजपादी उपाय सांगितले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी माझी विचारपूस केली. संत आणि साधक यांनी माझ्या कुटुंबियांना धीर दिला. साधक प्रतिदिन माझ्यासाठी जेवण बनवून ते आणून द्यायचे. डॉ. ज्योती काळे, डॉ. शिंदे आणि रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्य यांनी उज्ज्वलला आवश्यक त्या वेळी मार्गदर्शन केले. सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) ‘मला सुविधा उपलब्ध व्हाव्यात’, यासाठी प्रयत्नरत होत्या. मी परात्पर गुरु डॉक्टर, संत आणि साधक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले होते, ‘‘कापडिया परिवार हा सनातन परिवारच आहे.’’ या कालावधीत मी ते प्रत्यक्ष अनुभवले.’

– श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा, गोवा. (८.५.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक