फोंडा (गोवा) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णालयात आलेले अनुभव आणि अनुभूती !

४.१.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘श्री. प्रताप कापडिया  कोरोनामुळे रुग्णाईत असतांना रुग्णालयात भरती केल्यानंतर  त्यांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी पाहिले. आज यासंदर्भातील उर्वरित सूत्रे पाहूया.

भाग १ वाचा पुढील मार्गिकेवर : https://sanatanprabhat.org/marathi/540980.html

(भाग २)

५. अतीदक्षता विभागात हालवल्यावर तेथील कर्मचार्‍यांचा लक्षात आलेला गलथानपणा

५ अ. परिचारिकेने गंभीर स्थितीतील रुग्णाला चाकांच्या आसंदीतून अतीदक्षता विभागात जाण्याविषयी विचारणे आणि त्यानंतर ‘वॉर्डबॉय’ने ‘ऑक्सिजन’ लावण्याची सोय असलेल्या रुग्णशिबिकेवरून रुग्णाला पळवत नेणे : चौथ्या दिवशी माझ्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्याने मला प्राणवायूची आवश्यकता भासली. दुसर्‍या दिवशी मला ‘ऑक्सिजन’ लावला असूनही धाप लागत असल्याने मला अतीदक्षता विभागात भरती करण्याचे ठरले. रुग्णालयात ‘ऑक्सिजन’ लावण्याची सोय असलेली रुग्णशिबिका (स्ट्रेचर) नव्हती; म्हणून परिचारिकेने मला विचारले, ‘‘तुम्ही चालत किंवा चाकांच्या आसंदीतून जाऊ शकाल का ?’’ तेव्हा उज्ज्वलने ‘यांची स्थिती पाहून यांना ‘ऑक्सिजन’ची नळी लावण्याची सोय असलेली रुग्णशिबिकाच हवी’, असे सांगितले. तेव्हा एका ‘वॉर्डबॉय’ने ‘ऑक्सिजन’ची नळी लावण्याची सोय असलेली रुग्णशिबिका शोधून आणली. मला रुग्णशिबिकेवर झोपवून ‘मास्क’ लावल्यावर काही कारणास्तव त्याची नळी निघत होती. ‘वॉर्डबॉय’ने शर्यतीत धावत असल्याप्रमाणे माझी रुग्णशिबिका पळवत मला अतीदक्षता विभागात नेले. मला वाटले, ‘मला अतीदक्षता विभागात चालत जायला २० मिनिटे लागली असती. मला ‘ऑक्सिजन’ लावूनही धाप लागत होती, तर चालत गेल्यावर माझे काय झाले असते ?’ काही वेळाने एक आधुनिक वैद्य आले आणि त्यांनी सांगितले, ‘‘यांना आधी ‘एन्.आर्.बी.एम्.मास्क’ लावूया.’’ (‘एन्.आर्.बी.एम्. मास्क’ आधुनिक पद्धतीचा ‘ऑक्सिजन मास्क’ असतो. यामध्ये साधारण ‘मास्क’च्या तुलनेत एकाच वेळी अधिक प्रमाणात ‘ऑक्सिजन’ देण्याची क्षमता असते. त्याला एका फुग्याप्रमाणे पिशवी असते. तिच्यात ‘ऑक्सिजन’ साठतो आणि एका वेळी मोठ्या प्रमाणात शरिरात घेता येतो. या ‘मास्क’ला ‘बलून मास्क’, असेही म्हणतात.)

५ आ. ‘वॉर्डबॉय’ने रुग्णाला तुटलेले ‘बेडपॅन’ देणे, मलविसर्जन केलेले ‘बेडपॅन’ धुऊन त्यात तोंड धुण्यासाठी पाणी देणे आणि मूत्रविसर्जन करायच्या भांड्याला बुरशी लागलेली असल्याने नवीन भांडे आणावे लागणे : एकदा मी ‘वॉर्डबॉय’ला ‘बेडपॅन’ (मलविसर्जनाचे भांडे) मागितल्यावर त्याने मला तुटलेले ‘बेडपॅन’ दिले. मी त्याला सांगितले, ‘‘यावर बसले, तर त्याचे २ तुकडे होतील आणि मलाही लागेल.’’ तेव्हा त्याने मला दुसरे ‘बेडपॅन’ दिले. तेही थोडे तुटलेले होतेच; पण आधीपेक्षा बरे होते.

काही वेळाने ‘वॉर्डबॉय’ने मला ‘तोंड धुवायचे आहे का ?’, असे विचारून तेच ‘बेडपॅन’ धुऊन त्यामध्ये पाणी आणून दिले. तेव्हा मी ‘नको’ म्हटले. त्या दिवसापासून घरी जाईपर्यंत मी दात घासलेच नाहीत; कारण ते त्याच ‘बेडपॅन’च्या भांड्यात पाणी आणून देत होते. मी माझ्याकडे असलेल्या ‘टिश्यू पेपर’ने तोंड आणि शरीर पुसत होतो. रुग्णांना मूत्रविसर्जन करण्यासाठी जे भांडे दिले जायचे, त्याला बुरशी आली होती. उज्ज्वलच्या हे लक्षात आल्यावर त्याने मला औषधालयातून नवीन भांडे आणून दिले.

६. स्वतःच्या अयोग्य आणि त्रासदायक वागण्यामुळे इतरांना मनस्ताप देणारे काही रुग्ण !

अ. जे रुग्ण चालू शकत होते, ते त्यांना लावलेला ‘ऑक्सिजन’चा पुरवठा बंद न करताच शौचालयात किंवा पाणी भरायला जायचे. अशा वेळी ‘ऑक्सिजन’चा तुटवडा आहे आणि आपण तो वाया घालवत आहोत’, असा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता.

आ. एका रुग्णाची प्रकृती ठीक झाल्यावर आधुनिक वैद्य त्याला ‘डिस्चार्ज’ द्यायला (रुग्णालयातून घरी पाठवायला) सिद्ध होते; पण तो म्हणाला, ‘‘मला आणखी ३ दिवस इथेच ठेवा, तरच मला सरकारकडून पैसे मिळतील; नाहीतर मला १० ते १५ सहस्र रुपये भरावे लागतील.’’ (‘एखादी व्यक्ती रुग्णालयात ७ दिवस कोविड उपचारांसाठी राहिली, तर सरकार त्याचे देयक भरते’, अशी एक योजना होती.) अशा प्रकारे त्या रुग्णाने अतीमहत्त्वाचा १ ‘ऑक्सिजन बेड’ आवश्यक नसतांना अडवून ठेवला.

इ. एका रुग्णाला त्याची बायको जेवण आणून द्यायची. तेव्हा ते दोघेही एकाच ताटातून जेवत असत. त्यामुळे सामाजिक अंतर (‘सोशल डिस्टन्स’) पाळले जात नव्हते.

७. रुग्णालयात कर्मचारी अल्प असणे, त्यांना सर्व प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असूनही त्यांनी कर्तव्य पार पाडणे आणि त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

रुग्णालयातील कर्मचार्‍यांची संख्या अल्प असूनही ते हे सर्व सांभाळत होते. ‘कोरोना वॉर्ड’मध्ये सेवा करणारे बरेच कर्मचारी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ होते. या स्थितीतही ते रुग्णांची सेवा करत होते. ‘वॉर्डबॉय’ २० रुग्णांचा १ ‘वॉर्ड’, असे ३ ‘वॉर्ड’ सांभाळत होते. तेथील सर्व प्रकारची कामे तो एकटाच ‘वॉर्डबॉय’ करत होता. हे पाहून मला सर्वच कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता वाटली.’

– श्री. प्रताप कापडिया (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), फोंडा, गोवा. (८.५.२०२१)