कोरोना महामारीच्या उपाययोजनांसाठी केंद्राने दिलेल्या निधीपैकी महाराष्ट्राकडून ०.३२ टक्के निधीचाच वापर !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे दैनावस्था अनुभवलेल्या महाराष्ट्रात असे घडणे कदापि अपेक्षित नाही ! यासाठी उत्तरदायी प्रशासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, हेसुद्धा जनतेला समजले पाहिजे ! – संपादक

मुंबई – कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला  दिलेला निधी खर्चच केलेला नाही, असे ‘पीआयबी’ने (प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो – माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत बातम्या देण्याचे काम करणारी संस्था) म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारसाठी प्रस्तावित एकूण १ सहस्र २९४ कोटी रुपये होते. त्या निधीपैकी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला ६८३ कोटी रुपये दिले आणि त्यांपैकी केवळ ०.३२ टक्के निधीच वापरला असल्याचे पीआयबीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मुंबईत ४ जानेवारी या दिवशी नव्या १० सहस्र ८६० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे ४ जानेवारीपर्यंतची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाख १८ सहस्र ४६२ झाली.