ठाणे, ४ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांनी ठाणे जिल्ह्यातील संत, लोकप्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची भेट घेतली. या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.
धर्मकार्यासाठी हिंदु जनजागृती समितीला साहाय्य करू ! – भाऊ म्हात्रे, हिंदुत्वनिष्ठ, उल्हासनगर
‘हिंदूंनी संघटित होऊन कृतीशील झाले पाहिजे. युवकांमध्ये धर्मविषयक जागृती होणे आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करू’, असे उल्हासनगर येथील हिंदुत्वनिष्ठ भाऊ म्हात्रे यांनी सांगितले. ‘धर्मकार्यासाठी समितीला साहाय्य करू’ असेही ते म्हणाले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
हिंदु धर्माचरण करत नसल्यामुळेच धर्मावरील आघात वाढत आहेत ! – प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती
हिंदूंनी स्वतःतील शौर्य जागृत करून कृतीशील व्हायला पाहिजे. अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे आचरण कट्टरतेने करत असतांना हिंदु मात्र धर्माचे आचरण करत नाहीत. त्यामुळेच धर्मावरील आघात वाढलेले आहेत. या आघातांच्या विरोधात केवळ बोलून चालणार नाही, तर कृतीशील व्हायला पाहिजे. असे उद्गार बदलापूर येथील संत प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांच्याशी बोलतांना काढले. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास आशीर्वाद दिले. प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती यांना या वेळी ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
प.पू. स्वामी कृष्णानंद सरस्वती पुढे म्हणाले, ‘‘देवाने जन्माला घालतांना प्रत्येकाला सर्व सदृढ अवयव दिले आहेत. प्रत्येक अवयवाची किंमत करता येणार नाही. मौल्यवान शरिराने आपण साधना केली, धर्मकार्य केले, तरच मनुष्यजन्माचे सार्थक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने साधना करायला हवी.’’
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीला कळण्यासाठी गडकिल्ल्यांचे रक्षण होणे महत्त्वाचे ! – राजेंद्र साळवी, सरचिटणीस, अखिल मराठा फेडरेशन
विशाळगडावर झालेले अतिक्रमण हा विषय सांगितल्यावर राजेंद्र साळवी म्हणाले ‘‘गड-किल्ल्यांवर अतिक्रमण होणे, हे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवकांना कळावा यासाठी आधुनिक उपाययोजना करून पुढील पिढीला हा इतिहास सांगितला पाहिजे.’’ हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. मराठा मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये समितीला बोलावून विषय मांडण्याची संधी देऊ, असे त्यांनी या वेळी सांगितले. साळवी यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
उद्योजकांचे संघटन होण्यासाठी प्रयत्न करणार ! – गिरीश ढोकीया, उद्योजक
‘आज उद्योजकांचे संघटन होणे आवश्यक आहे. उद्योजकांचे संघटन होण्यासाठी प्रयत्न करू’, असे उद्योजक गिरीश ढोकीया यांनी सांगितले. त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांचा शाल देऊन सत्कार केला. सुनील घनवट यांच्या हस्ते त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.
धर्मकार्यासाठी कधीही स्वतःचे सभागृह उपलब्ध करून देऊ ! – प्रदीप नवार
हिंदूंचे संघटन व्हायला पाहिजे. धर्मकार्यासाठी कधीही माझे सभागृह उपलब्ध करून देईन. मी स्वतः संचालक असलेल्या ग्रंथालयांमध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथ ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करू, असे हिंदुत्वनीष्ठ प्रदीप नवार यांनी या भेटीत सांगितले.
हलाल प्रमाणपत्राविषयी व्यापार्यांमध्ये जागृती करणार ! – प्रफुल्ल भोसले, हिंदुत्वनिष्ठ, उल्हासनगर
हलाल प्रमाणपत्राविषयी माहिती दिल्यावर ‘हा विषय अत्यंत गंभीर असून तो कुणालाही माहीत नाही. या विषयासंदर्भात व्यापार्यांमध्ये जागृती करू’, असे उल्हासनगर येथील हिंदुत्वनिष्ठ प्रफुल्ल भोसले यांनी सांगितले. राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथ त्यांच्या कार्यालयात लोकांना वाचण्यास ठेवणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
हिंदु जनजागृती समिती चिकाटीने धर्मकार्य करत असल्यामुळेच हिंदूंमध्ये जागृती होत आहे ! – वामन म्हात्रे, माजी नगराध्यक्ष, बदलापूर
हिंदु जनजागृती समिती चिकाटीने धर्मकार्य करत आहे. त्यामुळेच हिंदूंमध्ये जागृती होत आहे. हिंदूंनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे. असे शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी सांगीतले. या वेळी नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. त्या वेळी वामन म्हात्रे आणि अनिल भगत यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.