विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

संपादकीय

जिमी कॉनर्स आणि भारतीय बनावटीची लस ‘कोव्हॅक्सिन’

अमेरिकेतील माजी प्रसिद्ध टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांनी अमेरिकेच्या सरकारला तेथील नागरिकांसाठी भारताने बनवलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीला मान्यता द्यावी, यासाठी आग्रह धरला आहे. त्यांनी याविषयी ट्वीट करतांना लिहिले आहे की, आपण नेहमीच ‘फायझर’ आणि ‘मॉडर्ना’ यांनी सिद्ध केलेल्या लसींविषयीच बोलतो; मात्र इतरांना संधी द्यायला हवी. कोव्हॅक्सिनला मान्यता का नाही ? कोव्हॅक्सिन हे तातडीच्या कारणांसाठी वापरण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. कॉनर्स यांचे हे ट्वीट अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे. नवीन प्रकारच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे ही रुग्णसंख्या वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या विरोधातील लस देण्यात आल्यानंतरही सध्या प्रत्येक दिवशी २ लाख ६५ सहस्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे, असे जॉन हॉपकिन्स विद्यापिठाने नोंदवलेल्या निरीक्षणात आढळले आहे. गत आठवड्यात अमेरिकेतील प्रतिदिनच्या रुग्णसंख्येने ५ लाखांहून अधिक रुग्ण मिळाल्याची विक्रमी नोंद केली आहे, त्या खालोखाल फ्रान्स २ लाख, ब्रिटन १ लाख ८९ सहस्र, तर भारतात केवळ १६ सहस्र रुग्णसंख्या नोंदवली आहे.

अमेरिका आणि युरोप येथे वाढलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या प्रकारामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, हे आकडेवारीवरून लक्षात आले आहे. त्यामुळे तेथे काही भागांत अंशत: दळणवळण बंदी, रात्रीचे निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत. कॉनर्स यांनी ट्वीट केल्याप्रमाणे तेथील मोठ्या औषध निर्माण आस्थापनांनी सिद्ध केलेल्या लसी घेऊनही पुन्हा कोरोना झालेला आहे. त्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची आकडेवारी पुष्कळ अल्प आहे, तसेच बाधित होण्याचा वेगही अल्प आहे. हा निश्चितपणे भारतीय लसींच्या लसीकरणाचा परिणाम आहे.

१ वर्ष ११ मासांपूर्वी जेव्हा कोरोनाचा विस्फोट झाला, तेव्हा जगभरात कोट्यवधी लोक बाधित झाले होते. या आजारावर काय उपाय आहे ? कोणते औषध घ्यायचे ? याविषयी संभ्रमावस्था होती आणि उदासीन वातावरण होते. अशा वेळी भारतातील ‘हायड्रोक्सोक्लोरोक्वीन’ गोळ्यांची मात्रा या आजाराला लागू पडते, असे चाचण्यांच्या अंती लक्षात आले. भारताने या गोळ्यांचे विक्रमी उत्पादन केले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला या गोळ्या अमेरिकेसाठी प्राधान्याने देण्याची मागणी नव्हे, तर धमकीच दिली. भारताने या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची सिद्धता केल्यावर या गोळ्यांसाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने पुष्कळ आडकाठी केली. परिणामी गोळ्यांचे उत्पादन करण्यास विलंब झाला. याविषयी भारताने त्याची कडक भूमिका अमेरिकेला कळवल्यावर अमेरिका कच्चा माल देण्यास सिद्ध झाली. ही आडकाठी करण्यात ‘अमेरिकेतील औषध निर्माण आस्थापनांच्या पुढे भारतीय औषध निर्माण आस्थापने जाऊ नयेत, अमेरिकेच्या आस्थापनांना अधिकाधिक लाभ व्हावा, हा एक छुपा हेतू होता’, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. युरोप, अमेरिका आणि भारत येथील आस्थापनांनी अल्प-अधिक कालावधीच्या फरकाने कोरोनावरील लस शोधण्यात यश मिळवले. यापैकी ‘फायझर-ॲस्टाझेनेका ’या आस्थापनाच्या लसी घेतल्यामुळे युरोपात काही देशांमध्ये प्रारंभी लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे लसीकरण काही काळ थांबवण्यातही आले; मात्र ते पुन्हा चालू करण्यात आले. त्या उलट भारतातील ‘कोव्हिशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ या लसींमुळे मृत्यू झाल्याची उदाहरणे नाहीत. तरीही भारतीय लसींना जागतिक मान्यता मिळवण्यासाठी अद्यापही संघर्ष करावा लागत आहे, तर विदेशी आस्थापनांच्या लसींनी भारतात उपयोग करण्यासाठी मान्यता मिळवली आहे.

भारतीय लस जगात अव्वल !

भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ लस

भाग्यनगर येथील ‘भारत बायोटेक’ने कष्ट करून विकसित केलेली लस जागतिक स्तरावर मान्यता मिळवण्यासाठीही किती कष्ट करावे लागले, हे सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रमणा यांनी काही दिवसांपूर्वी एका भाषणात सांगितले. कोव्हॅक्सिन ही भारतीय लस असल्याने फायझरसारख्या परदेशी आस्थापनाने आणि भारतातील काही जणांनी कोव्हॅक्सिनला अल्प लेखण्याचा प्रयत्न केला, जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळू नये म्हणूनही प्रयत्न केले आहेत; मात्र लसीचे निर्माते सर्वांना पुरून उरले. काही दिवसांपूर्वी भारतात लसीकरण करून आलेल्यांना ब्रिटनमध्ये जाणूनबुजून १० दिवस अलगीकरणात ठेवण्याचा नियम करण्यात आला; भारतानेही ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देत युरोपातून लसीकरण करून आलेल्यांना हाच नियम लागू केला, तेव्हा ब्रिटनने नियम हटवला. जर्मनीच्या माजी चॅन्सेलर (राष्ट्रप्रमुख) अँजेला मर्केल यांनी ‘भारत हे जगाचे औषधालय आहे’, असे सांगितले होते.

कोरोना आणि आयुर्वेद

सहस्रो वर्षे भारतियांचे आरोग्य सांभाळणारा ‘आयुर्वेद’ हा भारताचा ठेवा आणि अतिशय प्रगत आरोग्यशास्त्र आहे. आयुर्वेदात अनेक आजारांवरील औषधांचा विचार केला आहे. असा कोणताही आजार नाही की, ज्यावर आयुर्वेदामध्ये उत्तर नाही. अगदी शल्यकर्म करण्यापर्यंत भारतीय ऋषी प्रगत होते. भारतातील नैसर्गिक साधनसंपत्ती, अमूल्य औषधी वनस्पती, येथील वैद्यकांची साधना, परंपरा यांमुळे भारतीय औषधांमध्ये दैवी गुण आहे. अतिशय जुनाट आजार भारतीय औषधांनी बरे झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत; मात्र केवळ विदेशी ते सर्व चांगले आणि देशी अथवा भारतीय ते सर्व वाईट, अशी घातक मानसिकता अगदी सरकारी पातळीपासून ते शहरी भागात आहे. दुसरीकडे विदेशात भारतीय गुणवत्तेला प्राधान्य देण्यात येत आहे, ती मान्यता पावत आहे, असे दिसून येते. विदेशी मोठ्या आस्थापनांचे प्रमुख आता भारतीयच होत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !