१. पू. भार्गवराम यांची गुरुमहिमा समष्टीपर्यंत पोचवण्याची तळमळ !
‘एकदा गुरुपौर्णिमेपूर्वी आमचे दूरचे नातेवाईक आमच्या घरी आले होते. आम्ही ‘त्यांना गुरुपौर्णिमेविषयी सांगूया’, असे ठरवले होते. पू. भार्गवराम यांना ही गोष्ट ठाऊक नव्हती. नातेवाईक आल्यानंतर आरंभी आम्ही त्यांच्याशी अन्य विषयांवर बोलत होतो. त्या वेळी पू. भार्गवराम त्यांच्याजवळ असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ त्या नातेवाइकांच्या मुलाला दाखवू लागले. त्यांनी त्या मुलाला ज्या पृष्ठांवर गुरुदेवांच्या कार्याविषयी माहिती दिली होती, ती सर्व पृष्ठे २ वेळा दाखवली. त्यानंतर पू. भार्गवराम त्या मुलाला संस्थेविषयी सांगत होते. त्या वेळी पू. भार्गवराम यांची गुरुमहिमा समष्टीपर्यंत पोचवण्याची तळमळ आमच्या लक्षात आली.
२. आजोबांना ताण आला असतांना पू. भार्गवराम यांनी त्यांना ‘गुरुदेव आपल्या समवेत सदैव असतील’, असे सांगून सकारात्मक रहाण्यासाठी साहाय्य करणे
आपत्कालीन स्थितीमुळे माझ्या वडिलांच्या घराचे स्थलांतर करायचे होते. त्या वेळी माझ्या वडिलांना पुष्कळ ताण आला होता. मी आणि पू. भार्गवराम माझ्या माहेरी गेलो होतो. आम्ही तेथून निघण्याच्या वेळी पू. भार्गवराम यांनी घरातून ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ आणून माझ्या वडिलांच्या हातात दिला आणि ते माझ्या वडिलांना म्हणाले, ‘‘चिंता करू नका. गुरुदेव आपल्या समवेत सदैव असतील.’’ तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू आले. पू. भार्गवराम यांनी माझ्या वडिलांना सकारात्मक रहाण्यासाठी साहाय्य केले आणि ‘गुरुदेवच आपले आधारस्तंभ आहेत’, हे सोप्या भाषेत समजावले.
३. कोरोनाच्या कालावधीत साधक सेवा करतात त्या वास्तूमध्ये येण्यासाठी हट्ट करणार्या महिलेला ‘गुरुदेव तुमच्या घरातही आहेत’, असे सांगून समजावणे
कोरोनाच्या कालावधीत एकदा एक महिला साधक सेवा करतात त्या वास्तूमध्ये येण्यासाठी पुष्कळ हट्ट करत होती. पू. भार्गवराम यांनी हे दृश्य पाहिले होते. दुसर्या दिवशी त्या महिलेने पू. भार्गवराम यांना वास्तूचे फाटक उघडण्यास सांगितले. तेव्हा पू. भार्गवराम त्या महिलेला समजावण्यासाठी म्हणाले, ‘‘गुरुदेव सर्व ठिकाणी (सूक्ष्मातून) आहेत. आता ते तुमच्या घरातही आहेत. ते तुमच्या घरी प्रतिदिन येतात. तुम्ही पाहिले नाही का ?’’ त्यानंतर त्यांनी धावत जाऊन उत्तरदायी साधकाला बोलावून आणले.
४. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा
कोरोना महामारीच्या काळात श्री. रूपेश गोकर्ण या साधकाचा ताप उतरत नव्हता. त्यांना कोरोनाविषयीची चाचणी करण्यासाठी घेऊन जातांना पू. भार्गवराम यांनी मला विचारले, ‘‘ते कुठे जात आहेत ?’’ मी पू. भार्गवराम यांना त्याविषयी सांगितले. तेव्हा पू. भार्गवराम त्वरित म्हणाले, ‘‘गुरुदेव सर्व साधकांचे रक्षण करत आहेत. रूपेशअण्णांना कोरोना होणार नाही. ते बरे होतील.’’ (रूपेशअण्णांना कोरोना झाला नाही. – सौ. भवानी प्रभु)
५. प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील चित्रे गंभीरपणे आणि पुष्कळ वेळ पहाणे अन् त्याचे त्यांनी सांगितलेले कारण
पू. भार्गवराम प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी ३० मिनिटे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातात. ते दुसरे कोणतेही पुस्तक पहातांना सहजतेने पाने पालटून पहातात; परंतु ते ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील प्रत्येक चित्र पुष्कळ गंभीरपणे आणि पुष्कळ वेळ पहातात.
यासंदर्भात पू. भार्गवराम म्हणाले, ‘‘या ग्रंथात गुरुदेवजी आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची छायाचित्रे आहेत. ती पाहून ‘ते खरोखरच तेथे आहेत’, असे मला वाटते आणि माझी भावजागृती होते; म्हणून मी तो ग्रंथ पहातो.’’
६. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
६ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पोट दुखत असल्याने त्यांनी अन्न ग्रहण केले नाही’, हे सूक्ष्मातून ओळखून त्यांच्या छायाचित्राला खाऊ भरवणे : ३१.३.२०२१ ला रात्री ११ वाजता पू. भार्गवराम यांनी ‘क्ले’पासून काही खाऊचे आकार बनवले. (‘क्ले’ म्हणजे विविध आकार बनवण्यासाठी वापरण्यात येणारी विशिष्ट प्रकारची माती.) पू. भार्गवराम ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथासमोर बसून तो खाऊ त्यांच्या छायाचित्राला चमच्याने भरवत होते. ते गुरुदेवांना ‘तुमची पोटदुखी थांबेल’, असे सांगत होते. मी त्यांना विचारले, ‘‘काय चालले आहे ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांचे पोट दुखत आहे आणि ते काहीच खात नाहीत.’’ पू. भार्गवराम गुरुदेवांना पुनःपुन्हा ‘थोडे तरी खा’, असे सांगत होते. मी याविषयी रामनाथी आश्रमातील साधकाला सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘त्या दिवशी गुरुदेवांचे पोट बरे नव्हते. त्यांना अधूनमधून असा त्रास होत असतो.’’
६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ थकवा आला असल्याचे सूक्ष्मातून ओळखून त्यांच्या छायाचित्रासमोर औषध ठेवणे आणि प्रार्थना अन् नामजप करणे : १.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ६ वाजता पू. भार्गवराम पुष्कळ गंभीर होऊन मला म्हणाले, ‘‘गुरुदेवांना औषध द्यायचे आहे.’’ त्यानंतर पू. भार्गवराम यांनी शीतकपाटातून तुळशीचा रस काढून एका पेल्यात घेतला आणि तो देवघरातील गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवला. त्यांनी हात जोडून मनातल्या मनात भावपूर्ण प्रार्थना केली आणि ते बसून ‘हं, हं ’, असा जप करू लागले. मी याविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘गुरुदेवांना त्या दिवशी पुष्कळ थकवा वाटत होता.’’ तेव्हा ‘पू. भार्गवराम सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात राहून त्यानुसार कृती करत आहेत’, हे माझ्या लक्षात आले.
७. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळची पू. भार्गवराम यांची ध्यानावस्था !
वर्ष २०२१ मध्ये परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या वेळी पू. भार्गवराम नमस्काराच्या मुद्रेत बसले होते. त्या वेळी ते ध्यानावस्थेत जात होते. तेव्हा त्यांची ध्यानाची अशी स्थिती मला प्रथमच पहायला मिळाली.’
– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू, कर्नाटक. (२१.१०.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |