‘कोव्हिशिल्ड’ लसीचा परिणाम ३ मासांत अल्प होऊ लागत असल्याने वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेणे आवश्यक ! – संशोधकांचा निष्कर्ष

नवी देहली – ‘लँसेट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार ‘ज्या लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाच्या गंभीर संसर्गापासून वाचण्यासाठी वर्धक मात्रेची (‘बूस्टर डोस’ची) आवश्यकता आहे. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर लसीचा परिणाम ३ मासांतच अल्प होऊ लागतो.’ या अहवालात ब्राझिल आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. भारतात बहुतांश लोकांनी ‘कोव्हिशिल्ड’ लस घेतली आहे. त्यामुळे हा अहवाल भारतियांसाठी चिंता वाढवणारा आहे.

१. या अहवालातील संशोधनामध्ये म्हटले आहे की, कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेतलेले स्कॉटलंडचे २० लाख आणि ब्राझिलच्या ४ कोटी २० लाख लोकांची माहिती  गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आले. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर लसीचा परिणाम ३ मासांतच अल्प होऊ लागतो. या काळात रुग्णालयामध्ये भरती होणे, तसेच मृत्यू होणे, यांची शक्यता दुसरा डोस घेतल्याच्या २ आठवड्यांच्या तुलनेत दुप्पट होते. दुसरा डोस घेतल्याच्या ४ मासांनी ही शक्यता तिप्पट होते.

२. ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग’चे प्राध्यापक अजीज शेख यांनी म्हटले की, ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली नाही, ते आणि लस घेतलेले हळूहळू एकाच पातळीवर येण्याची भीती आहे. कोरोना लसीचा प्रभाव कधीपासून अल्प होतो, हे समजल्यास सरकारकडून वर्धक मात्रा (बूस्टर डोस) कधीपासून चालू करावी, याचा निर्णय घेणे सोपे जाईल.