औषधाविना ‘स्वयं उपचार पद्धत’ वापरून ‘साधकांचे शारीरिक त्रास न्यून व्हायला हवेत’, अशी तळमळ असणारे डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) !

डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) यांच्याकडून ‘स्वयं उपचार पद्धत’ शिकतांना साधिकेला आलेले अनुभव आणि त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

डॉ. दीपक जोशी

१. साधिकेवर ‘स्वयं उपचार पद्धती’ने उपचार केल्यावर झालेले लाभ

१ अ. डॉ. दीपक जोशी यांनी उपचार करताच कानाचे दुखणे न्यून होणे : ‘डॉ. दीपक जोशी यांच्या हाताला गुण आहे. माझा डावा कान पुष्कळ दुखत होता. त्यांनी उपचार करताच १५ मिनिटांत माझ्या कानाचे दुखणे न्यून झाले आणि आतापर्यंत परत तो कान कधीही दुखला नाही.

१ आ. भुवया आणि डोके यांवर बिंदूदाबन उपचार केल्यानंतर साधिकेला रात्री व्यवस्थित झोप लागणे : मला पुष्कळ दिवसांपासून ‘रात्री झोप न येणे आणि झोपेत अचानक जाग येणे अन् त्यानंतर झोप न लागणे’, असे त्रास होते. डाॅ. जोशी यांनी मला ‘भुवया आणि डोके यांच्यासाठी बिंदूदाबन उपचार कसे करावे ?’, ते सांगितले. त्यानुसार मी बिंदूदाबनाचे उपचार केल्यानंतर मला रात्री व्यवस्थित झोप लागते. त्यामुळे मला सकाळी लवकर उठता येते. आता माझी झोप पुरेशी होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

१ इ. ‘डोक्याला घट्ट पट्टी आवळून ती लगेच सैल करणे’ या उपचार पद्धतीनंतर साधिकेचे डोके दुखणे थांबणे आणि खांद्यावरील बिंदू दाबताच संपूर्ण शरीर हलके होणे : काही दिवसांपासून माझ्या सहस्रारचक्रात वेदना होत असल्याने माझे डोके आणि डोळे पुष्कळ जड वाटत होते. डॉ. जोशी यांनी केलेल्या ‘डोक्याला घट्ट पट्टी आवळून ती लगेच सैल करणे’ या उपचार पद्धतीनंतर माझे डोके दुखणे थांबले. तसेच खांद्यावरील बिंदू दाबताच माझे संपूर्ण शरीर हलके झाले. त्यामुळे माझ्या मनावरील त्यासंदर्भातील ताणही दूर झाला. ही स्थिती मी दुसर्‍या दिवशीही अनुभवू शकले.

१ ई. डॉ. दीपक जोशी शिकवत असलेली उपचारपद्धत औषधाविना रुग्णांना अल्पावधीत बरी करणारी असणे : डॉ. दीपक जोशी जी उपचारपद्धत शिकवत आहेत, ती औषधाविना असून रुग्णांना अल्पावधीत बरी करणारी आहे. ‘येणार्‍या भीषण आपत्काळात आम्हा साधकांची व्याधी आणि विकार दूर होऊन आरोग्य चांगले रहावे आणि आमच्या प्राणांचे रक्षण व्हावे’, याकरता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी डॉ. दीपक जोशी यांना पाठवले आहे. त्याकरता त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

कु. सुगुणा गुज्जेटी

२. डॉ. दीपक जोशी यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. प्रेमभाव : डॉ. जोशी यांच्यात आत्मीयता, आपलेपणा आणि प्रेमभाव आहे. साधकांवर उपचार करतांना ते प्रेमाने करतात. समाजातील रुग्णांशीही ते तेवढ्याच प्रेमाने बोलतात.

२ आ. स्थिरता : समाजातील रुग्णांचे सर्व बोलणे ते शांततेने ऐकून घेतात आणि त्यांना उपचार सांगतात.

२ इ. सूक्ष्मातील कळणे : डॉ. जोशी यांना सूक्ष्मातील कळत असल्याने साधकांवर उपचार करण्यापूर्वी साधकांना ‘ज्या स्थानी वेदना होत असेल, ते स्थान शोधून त्यावर उपचार करतात.’

२ ई. रुग्णांवर उपचार करतांना सकारात्मकता आणि आत्मविश्वास असणे : डॉ. जोशी रुग्णांवर उपचार करतांना देवाला विचारून करतात. उपचार करतांना त्यांच्यात सकारात्मकता आणि आत्मविश्वास असतो. ‘साधकांचे शारीरिक त्रास न्यून व्हायला पाहिजेत’, अशी त्यांची तळमळ असते. त्या दृष्टीने ते रुग्ण साधकांचा आढावाही घेतात.

मी परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी प्रार्थना करते, ‘डॉ. दीपक जोशी यांच्यातील गुण माझ्यात येऊन त्यानुसार माझे आचरण होऊ दे.’

– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२१)


देवद (पनवेल) येथील डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार केल्यावर साधिकेच्या पायाचा त्रास न्यून होणे

श्रीमती पुर्णिमा प्रभू

१. डाव्या पायात पुष्कळ वेदना होऊन गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला आलेली गाठ न्यून न होणे आणि ‘क्ष-किरण तपासणी करूया’, असा विचार मनात येणे 

‘माझा डावा पाय १५ दिवसांपासून पुष्कळच दुखत होता. माझा गुडघा आणि पायाची पोटरी यांना सूज आली होती. मला चालतांना पुष्कळ वेदना होत होत्या. मी ३ दिवस आयुर्वेदीय मर्दन केले आणि आराम केला; पण केवळ १० टक्केच परिणाम जाणवला. मी मिठाच्या पाण्यात पाय ठेवल्यावर मला २० टक्के अधिक बरे वाटले; परंतु माझ्या गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला आलेली गाठ न्यून होत नव्हती. मला काही सुचत नव्हते. शेवटी माझ्या मनात ‘क्ष-किरण’ (एक्स-रे) तपासणी करूया’, असा विचार आला. याच कालावधीत सनातनचे साधक डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) हे देवद, पनवेल येथून रामनाथी आश्रमात आले.

२. डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार केल्यानंतर पायाच्या वेदना ९० टक्के बर्‍या होऊन चालता येणे आणि ‘बिंदूदाबन उपचाराने इतके बरे वाटू शकते’, याचे आश्चर्य वाटणे 

डॉ. दीपक जोशी साधकांना तपासून त्यांच्यावर बिंदूदाबन उपचार करत होते. मला त्यांच्याकडे जाण्याची संधी मिळाली. त्यांनी माझ्या डाव्या पायावरील त्यासंदर्भातील दोन बिंदू दाबले. त्यांनी ‘जिमी’ (बिंदूदाबनासाठी वापरण्यात येणारे धातूचे किंवा लाकडाचे उपकरण) फिरवली आणि माझ्या गुडघ्याची कळ ९० टक्के बरी झाली. मी चालू शकले. ‘बिंदूदाबन उपचाराने इतके बरे वाटू शकते’, हे मला खरेच वाटत नव्हते. त्यामुळे मी आश्चर्यचकित झाले होते. डॉ. जोशी यांनी मला सांगितले, ‘‘वातामुळे तुमचा पाय दुखत आहे.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्यावर डॉ. जोशी यांच्या माध्यमातून उपचार केले होते. माझी प्रार्थना परात्पर गुरुदेवांच्या चरणांजवळ पोचली होती. दयाळू आणि कनवाळू परात्पर गुरुदेवांनी डॉ. जोशी यांच्या माध्यमातून माझ्यावर उपचार केले.

३. डॉ. दीपक जोशी यांनी अचूक जागी बिंदूदाबन करणे आणि ते उपाय करत असतांना वेदनासुद्धा सहन होणे 

डॉ. दीपक जोशी बिंदूदाबन करायच्या आधी देवाला प्रार्थना करतात आणि अगदी अचूक जागी बिंदूदाबन करून उपचार करतात. ते बिंदूदाबन उपचार करत असतांना होणार्‍या वेदनासुद्धा आपल्याला सहन होतात. ‘त्यांच्या हातांत जादू आहे’, हेही मला जाणवले.

हे परात्पर गुरुदेवा, ‘तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर माझी काळजी घेऊन या घोर आपत्काळात माझे दुखणे दूर करून माझे जीवन आनंदमय करत आहात’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

– आपली चरणसेविका,

– श्रीमती पुर्णिमा प्रभू,  सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५. १२. २०२१ )

 येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक