नवर्षारंभ ‘३१ डिसेंबर’ला नव्‍हे, तर गुढीपाडव्‍याला साजरा करा !

नववर्ष या शब्‍दामध्‍येच ‘नव’ या शब्‍दाने नाविन्‍यपूर्ण गोष्‍टींचा संकेत मिळतो. नववर्ष या शब्‍दातून ‘काहीतरी नवीन असणे’ हे अभिप्रेत आहे. वर्तमान स्‍थितीत ३१ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्‍वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्‍स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. त्‍यामुळे एकप्रकारे ऐतिहासिक स्‍थळाचे पावित्र्यही धोक्‍यात येते. या संस्‍कृतीविरोधी गोष्‍टी थांबवण्‍यासाठी व्‍यापक स्‍तरावर जागृती करण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठीच हा लेखप्रपंच !

– अधिवक्‍ता सतीश आबासाहेब देशपांडे, परभणी


भारतातील अनेक प्राचीन कालगणनांपैकी एक म्‍हणजे ‘सप्‍तर्षी संवत !’

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या प्रकारची कालगणना आणि १ जानेवारीपासून नववर्ष समजण्‍याची भारताची संस्‍कृती नाही. भारताचे वैभव म्‍हणून ज्‍यांचे नाव आदराने घेतले जाते ते महान गणिततज्ञ भास्‍कराचार्य यांचे ! त्‍यांनी दिलेले अद्वितीय गणिताचे ज्ञान हा मानवी विकासातील एक मोठा टप्‍पा ठरला. कालगणना ही संकल्‍पना मूलतः भारतीयच आहे. भारतातील अनेक प्राचीन कालगणनांपैकी एक म्‍हणजे ‘सप्‍तर्षी संवत !’ ही कालगणना भारतातील काश्‍मीर प्रांतामध्‍ये चालू आहे. या कालगणनेचे सद्यस्‍थितीमध्‍ये ५०९८ वे वर्ष चालू आहे.

अधिवक्ता सतीश देशपांडे

वसंतऋतूत सृष्‍टीच्‍या नवजीवनाचे संकेत देत असल्‍याने तो वर्षांरंभ योग्‍य आहे !

भारतीय आयुर्वेद परंपरेनुसार आणि वाग्‍भट संहितेतील विस्‍तृत विवेचनानुसार भारतियांनी सर्व कालखंड ऋतुचर्येनुसार नियोजित केले होते. या ऋतुचक्रानुसार वसंत ऋतूचे आगमन म्‍हणजे चैत्र आणि वैशाख मास ! हा कालखंड भूतलावरील सर्वच संदर्भात नवजीवनाचे संकेत देत असतो. वृक्षांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटते, तसेच भारतीय संस्‍कृतीमधील अत्‍यंत महत्त्वाची वनस्‍पती गुळवेल याचे चैत्रमासात अंकुरण होते. एकूणच सृष्‍टी नवजीवनाचे संकेत देत असल्‍यामुळे अगदी प्राचीन काळापासून वसंत ऋतूस अनन्‍यसाधारण महत्‍व प्राप्‍त झाले आहे. यामुळे भारतीय संस्‍कृतीनुसार वसंत ऋतूच्‍या आगमन काळापासून नवीन वर्ष साजरे करणे ही परपंरा   आहे ! वसंत ऋतूच्‍या आगमनापर्यंत सर्व शेतीविषयक कार्य समाप्‍त होत असतात, तसेच शेतातील पिके पक्‍व होऊन त्‍याची कापणी केली जाते आणि पीक सिद्ध होऊन शेतकर्‍यांच्‍या घरी आणले जाते. भारत हा कृषीप्रधान देश असल्‍यामुळे याचे महत्त्व अधिकच अधोरेखित केले जाते. त्‍यामुळे नवीन कृषी कार्याचा आरंभही नववर्ष आगमन आणि त्‍याचे स्‍वागत याचेशी निगडित आहे.

असंख्‍य त्रुटी असलेले जुलियस आणि ग्रेगेरियन कॅलेंडर !

१ जानवेरी ते ३१ डिसेंबर या युरोपीय कालगणनेचा आरंभ हा कोणत्‍याही शास्‍त्रीय कारणांमुळे झालेला नसून या कालगणनेचा आरंभ केवळ रोमन सम्राट जुलियस सिझर याच्‍या हुकुमशाही प्रवृत्तीतून निर्माण झाला आहे. जुलियस सिझरने १ जानेवारीपासून नववर्ष साजरे करण्‍याविषयी कठोर नियमावली जारी केली. या कालगणनेसाठी शास्‍त्रीय आधार नसल्‍याने या कालगणनेमध्‍ये मुलतः असंख्‍य त्रुटी वारंवार निदर्शनास येत गेल्‍या आणि त्‍यामध्‍ये सतत सुधारणा होत राहिल्‍या. जुलियस सिझर याने वरील कालगणना चालू केली; म्‍हणून यास ‘जुलियस कॅलेंडर’ असेही म्‍हटले जात. वर्ष १५८२ मध्‍ये पोप ग्रेगोरी याच्‍या आदेशानुसार या कालगणनेतील बर्‍याचशा त्रुटींवर विचारविनिमय करून नवीन ‘कॅलेंडर’ जारी करण्‍यात आले. त्‍यामुळे वर्ष १५८२ नंतर याच कालगणनेस ‘ग्रेगेरियन कॅलेंडर’ असेही म्‍हटले जाते. डिसेंबर अथवा जानेवारी यामध्‍ये शास्‍त्रीय अथवा सामाजिकदृष्‍ट्या काहीच नाविन्‍यपूर्ण नसूनही १ जानेवारीपासून नववर्ष म्‍हणणे यास काहीच आधार नाही. वरील गोष्‍टींचा विचार करता भारतीय कालगणना फारच शास्‍त्रशुद्ध आणि अचूक असून भारतीय कालगणनेमध्‍ये कधीही आणि कोणतेही त्रुटी असल्‍याचे निदर्शनास आलेले नाही. त्‍यामुळे भारतीय कालगणना ही सर्वोच्‍च आहे.

पाश्‍चात्त्य कालगणनेमध्‍ये राजकीय हस्‍तक्षेप !

भारतीय कालगणनेतील मासांची नावे नक्षत्रांशी निगडित असून या कालगणना पद्धतीमध्‍ये इतिहासात कधीही राजकीय हस्‍तक्षेप झाल्‍याचे एकही उदाहरण सापडत नाही. याउलट मात्र इंग्रजी कालगणनेमध्‍ये जुलियस सिझरपासून जुलै, सम्राट ऑक्‍टोबियनपासून ऑक्‍टोबर, सम्राट ऑगस्‍टसपासून ऑगस्‍ट आणि इतरही मासांची नावे कुठल्‍याही आधाराविना ठेवण्‍यात आली आली आहेत. त्‍यामुळे या कालगणनेतील राजकीय हस्‍तक्षेप स्‍पष्‍ट होतो.

युरोपीय नववर्ष साजरे करणे, ही सांस्‍कृतिक गुलामगिरीच !

ब्रिटीश अमलामधील राजकीय व्‍यवहाराचे वर्ष म्‍हणून भारतात इंग्रजी नववर्ष साजरे करणे आणि राजकीय व्‍यवहारामधे त्‍याची कार्यवाही करणे चालू झाले. ब्रिटीश राजकीय सत्तेचा अस्‍त होऊन चौर्‍याहत्तर वर्ष उलटून गेल्‍यानंतरही अजूनही युरोपीय नववर्ष साजरे करण्‍याची पद्धत ही आपल्‍यामधील सांस्‍कृतिक गुलामगिरीची जाणीव करून देत आहे. लॉर्ड मॅकॉले याने वर्ष १८३६ मध्‍ये लिहिलेल्‍या पत्रानुसार ‘भारतीय संस्‍कृती नष्‍ट करणे’ हा इंग्रजांचा उद्देश यातून स्‍पष्‍टपणे दिसून येतो. लॉर्ड मॅकॉले याचे सांस्‍कृतिक आक्रमण खूपच भयंकर ठरले असून याद्वारे अतिशय हळूवारपणे भारतीय संस्‍कृतीमधील प्रतिके नष्‍ट होत आहेत; जसे विविध ‘डे’ (दिवस), जसे ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘व्‍हेलेनटाईन्‍स डे’ इत्‍यादी साजरे करण्‍याच्‍या नावाखाली भारतीयता नष्‍ट करण्‍याचा चंग बांधला गेला आहे आज ‘बर्थ डे’ (इंग्रजी तारखेनुसार वाढदिवस) हा भारतीय संस्‍कृतीचा अविभाज्‍य भाग बनून गेल्‍यासारखे दिसते. कित्‍येक विद्वानांसमवेत चर्चा करूनही ‘बर्थ डे’विषयी अद्यापही कोणताही शास्‍त्राधार सापडत नाही.

भारतीय संस्‍कृतीविषयी जागरूक राहून त्‍याचे पालन करणे आवश्‍यक !

एकूणच मागील एक सहस्र अकराशे वर्षे परकीय आक्रमणांपेक्षाही ब्रिटिशांचे सांस्‍कतिक आक्रमण भयंकर आणि भारतीय संस्‍कृतीसाठी कर्दनकाळ ठरले आहे. मागील शंभर-दीडशे वर्षांमध्‍ये भारतीय संस्‍कृती, जीवनशैली आणि भारतियांच्‍या उच्‍च सांस्‍कृतिक जीवन संकल्‍पना यांवर भीषण आणि वेगवान आघात याच क्रमाने चालू राहिले आहेत. त्‍यामुळे भारतीय समाज आपले मूळ अस्‍तित्‍व गमावून बसेल कि काय अशीही भीती वाटते; कारण सांस्‍कृतिक ओळख मिटल्‍यामुळे होणारे भयंकर विपरीत परिणाम सामूहिक विनाशाकडे नेतात. ‘भारतीय समाज आपल्‍या मूळ संस्‍कृतीविषयी जागरूक राहिला पाहिजे’, यासाठी व्‍यापक स्‍तरावर प्रयत्न करणे आवश्‍यक असून त्‍यामुळे भविष्‍यात होणारी हानी टाळता येऊ शकते. सांस्‍कृतिक बंधनांचे पालन करणे यासाठीच आवश्‍यक आहे. वरील सर्व गोष्‍टींचे योग्‍य विवेचन करून भारतीय नवयुवकांना आपल्‍या समृद्ध संस्‍कृतीच्‍या वारशाविषयी योग्‍य ती माहिती पुरवणे आवश्‍यक आहे; ज्‍याद्वारे वैचारिकदृष्‍ट्या भरकटलेली करणारी युवा पिढी योग्‍य आणि आपल्‍या संस्‍कृतीस अनुरूप अशा मार्गावर मार्गक्रमण करील; ज्‍याद्वारे भारतीय संस्‍कृती पुनर्वैभवाने उभी राहू शकेल.

अभक्ष्य भक्षण आणि मद्य पिणे याचे भारतीय संस्‍कृतीत कधीच समर्थन करता येणार नाही !

कुठल्‍याही समारंभासाठी मद्यपान आणि अभक्ष्य भक्षण हे भारतीय संस्‍कृतीत अमान्‍यच आहे. त्‍यामुळे नववर्ष स्‍वागतासाठीही वरील गोष्‍टींचा निषेधच लागेल. एकूणच नववर्ष स्‍वागतासाठी मध्‍यरात्री प्रचंड प्रमाणात संस्‍कृतीहीन वर्तन, तसेच प्रचंड मदिरा प्राशन करूनच अचेतन अवस्‍थेत पडून रहाणे आणि सार्वजनिक स्‍थळावरील विविध समारंभांद्वारे सामाजिक सुरक्षितताही धोक्‍यात आणणे अन् असल्‍या ऐतिहासिक वारशांचे पावित्र्य न राखणे याचे कदापीही समर्थन केले जाऊ शकत नाही.

भारतीय नववर्ष साजरे करण्‍याची संकल्‍पना मांगल्‍याचे प्रतीक !

याउलट भारतीय संस्‍कृतीमधील नववर्ष साजरे करण्‍याची संकल्‍पना मात्र पूर्णतः भिन्‍न असून ती एक मंगल्‍याचे प्रतीक आहे. नववर्ष हा एक चांगला मुहूर्त म्‍हणून गणला जातो. या दिवसापासून चांगली आणि महत्त्वपूर्ण कार्य करण्‍यास आरंभ करावा, अशी अपेक्षा याद्वारे व्‍यक्‍त केली जाते. तसेच याहूनही महत्त्वपूर्ण म्‍हणजे विविध ईश्‍वरीय पूजनांद्वारे भारतीय समाज नववर्षाचे स्‍वागत करत असतो. भगवान विष्‍णूंनींही रामावतारात चैत्र मासात म्‍हणजे, वसंतऋतूमध्‍येच अवतार घेतला. प्रभु श्रीरामचंद्रांचा राज्‍याभिषेकही चैत्र मासाच झाला. वालीचे अत्‍याचारी शासनही त्‍याचा वध करून याच मासात त्‍यांनी संपवले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच दुर्गामातेचे चैत्र नवरात्र प्रारंभ होते.

महाराष्‍ट्रातील गुढीपाडवा असो किंवा आंध्र आणि कर्नाटक मधील युगादी असो या दिवसांपासून आपल्‍या नवीन कृषिकार्याचा मुहूर्त होतो. त्‍यामुळे वैज्ञानिक किंवा अन्‍य सामाजिक दृष्‍टीकोनातून भारतीय नववर्ष हे गुढीपाडव्‍यापासूनच चालू होते. पाश्‍चात्त्य नववर्ष साजरे करण्‍याच्‍या संकल्‍पना पूर्णतः मोडीत काढल्‍या पाहिजेत आणि आपल्‍या समाजावरील सांस्‍कृतिक गुलामगिरीचे जोखड फेकून दिले पाहिजे. आपले अस्‍तित्‍व टिकवण्‍यासाठी भारतीय संस्‍कृतीस सर्वार्थाने महान आणि समृद्ध असल्‍याविषयी व्‍यापक जनजागृती आपल्‍याच पिढीने विविध स्‍तरांवर कार्य करणे आवश्‍यक आहे. तो आरंभ आपले नववर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता गुढीपाडव्‍याला करून करूया !

– अधिवक्‍ता सतीश आबासाहेब देशपांडे, परभणी