नोंद
कोरोना महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी आणि आधुनिक वैद्य यांनी अहोरात्र सेवा केली, तसेच निवृत्त आधुनिक वैद्य अन् कर्मचारी यांनीही अत्यल्प मानधनावर सेवा केली. या सर्वांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून त्यांचे मनोबल वाढवून समाजात मानाचे स्थान देण्यात आले. कालांतराने कोरोना रुग्णसंख्या अल्प झाल्यानंतर मानधनावर सेवा देणार्यांना मानधन देऊन सेवामुक्त करण्यात आले; परंतु गेल्या ६ मासांपासून सातारा जिल्ह्यात अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना वेतनच दिले गेले नाही. ‘कोरोना योद्धा’ उपाधी देऊन सरकार आणि प्रशासन यांनी आधुनिक वैद्यांची बोळवण केली खरी; परंतु वेतनासारख्या ज्वलंत प्रश्नावर दुर्लक्ष होणे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
मराठीत एक म्हण आहे, ‘कोणतेही सोंग घेता येते; पण ‘पैशा’चे सोंग घेता येत नाही.’ दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ‘पैसा’ आवश्यक आहे; मात्र काम आणि कौटुंबिक गरजा यांचा ताण आदींमुळे आधुनिक वैद्य तणावात आहेत. शाळा आणि महाविद्यालये चालू झाल्यामुळे मुलांच्या शालेय शुल्काचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. घराचे हप्ते, विविध कर्जांचे हप्ते या सर्वांची पूर्तता होत नसल्यामुळे आधुनिक वैद्यांना कौटुंबिक कलह, समाजातील पत अल्प होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेतनाविना केवळ ‘कोरोना योद्धा’ ही उपाधी देऊन हे प्रश्न सुटणार आहेत का ? असा प्रश्न आता ‘कोरोना योद्ध्यां’ना पडला आहे.
गत काही मासांपासून आधुनिक वैद्य कामांच्या घंट्याच्या व्यतिरिक्त विनामोबदला अधिक काम करत आहेत. जिल्हा वैद्यकीय अधिकारी आधुनिक वैद्य अन् कर्मचारी यांचे वेतन वेळेवर मिळावे, यांसाठी तळमळीने प्रयत्न करतांना दिसत नाहीत. त्यामुळे प्रतिमाह मिळणारे वेतन कधीच वेळेवर मिळत नाही, अशी ओरड होते, तर दुसरीकडे ‘वेतनाविषयी सतत वरिष्ठ स्तरावर बोलणी चालू असूनही ‘आज देऊ’, ‘उद्या देऊ’, याहून वेगळे उत्तर मिळत नाही’, असा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडून करण्यात येतो. ‘कोरोना काळात पैशांसाठी नाही, तर सेवा म्हणून काम केले, ‘बक्षीस’ राहू द्या; परंतु हक्काचे वेतन तरी द्या’, अशी आर्त विनवणी आरोग्य कर्मचारी अन् आधुनिक वैद्य करत आहेत. अशी वेळ प्रामाणिकपणे काम करणार्यांवर येणे, हे दुर्दैवी आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती समयमर्यादेत सोडवावी. हिंदु राष्ट्रात अशी स्थिती नसेल !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा