विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव !

डॉ. नीलम गोर्‍हे

मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे त्यांना उपसभापतीपदावरून दूर करावे, असा अविश्वासाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सादर केला. याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘न्यायदानाच्या ठिकाणी बसलेल्या असतांना उपसभापती नि:पक्षपाती भूमिका घेत नाहीत. त्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक आहे. अकोला महापालिकेच्या लक्षवेधीचा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांना तो राखून ठेवण्याविषयी मी उपसभापतींच्या निदर्शनास आणून दिले; परंतु त्यांनी विनंती फेटाळून लावत लक्षवेधी पुकारली. हा न्यायालयाचा अवमान आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याला आमचा विरोध नाही; परंतु विरोधी पक्षनेता हे संविधानिक दायित्व असतांना सभागृहात विरोधी पक्षनेत्याला जाणीवपूर्वक बोलू दिले नाही.