लुधियाना (पंजाब) – येथील न्यायालयात झालेला बाँबस्फोट गगनदीप सिंग याने घडवला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली. गगनदीप हा माजी पोलीस हवालदार असून त्याला अमली पदार्थांच्या तस्करीमुळे पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्याला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही झाली होती. याचवर्षी सप्टेंबर मासामध्ये त्याची कारागृहातून सुटका झाली होती. या स्फोटामध्ये २ किलो आर्.डी.एक्स. या स्फोटकाचा वापर करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
गननदीप याने हा स्फोट नेमका का घडवला, त्याला यासाठीचे प्रशिक्षण कुणी दिले, त्याच्यामागे कुणाचा हात आहे का, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे. गगनदीप याला बाँब कसा जोडायचा, याविषयी भ्रमणभाषवरून कुणीतरी मार्गदर्शन करत होते आणि त्याच वेळी त्याच्याकडून बाँबचा स्फोट झाला अन् त्यात त्याचा मृत्यू झाला. या स्फोटात अन्य ५ जण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार चालू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही देण्यात आली.