|
मुंबई – कर्नाळा नागरी सहकारी बँकेमध्ये ११२.५ कोटी रुपयांचे अवैध कर्ज दाखवून कोट्यवधी रुपयांच्या केलेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी या बँकेतील ठेवीदार खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करत आहेत. त्या अनुषंगाने राज्यशासनाने अपहारात सहभागी असणार्या संबंधितांवर कोणती कारवाई केली, असा तारांकीत प्रश्न आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला.
या प्रश्नावर सहकारमंत्री शामराव उपाख्य बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून सांगितले की, सहकार आयुक्तांच्या ४ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये अधिनियमाचे कलम ८८ अन्वये नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे यांनी एकूण २० दोषी लोकांविरुद्ध ५२९.३६ कोटी रुपये इतक्या रकमेसाठी दोषारोपपत्र बजावले आहे. संबधितांच्या ७० मालमत्तांवर २८ मे २०२१ या दिवशी जप्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने १३ ऑगस्ट २०२१ च्या आदेशान्वये सदर बँकेवर साहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुधागड पाली यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.