नवी मुंबई – मुंबई ते नवी मुंबई जलप्रवासी वाहतुकीचे (वॉटर टॅक्सी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार असून जनतेच्या वेळेचीही बचत होणार आहे; मात्र अन्य प्रवासी वाहतुकीपेक्षा जल प्रवासाचा व्यय अधिक असणार आहे. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि सिडको यांनी एकत्रितपणे काम केले आहे. मुंबई ते नवी मुंबईपर्यंत रस्ते मार्गाने जाण्यासाठी दीड ते पावणे दोन घंटे असा वेळ लागतो; मात्र जलप्रवासाद्वारे ३० मिनिटांपेक्षा अल्प वेळ लागणार आहे. याचे भाडे प्रति मिनिट ४५ रुपये आहे. ही सेवा वर्षातील ३३० दिवस सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत असेल. पावसाळ्यात सेवा बंद राहील. या सुविधेसाठी सध्या ५०, ४०, ३२ आणि १४ आसनी अशी चार जहाजे उपलब्ध आहेत. ती २५ नॉट्सच्या (नॉट्स म्हणजे जहाजाची गती मोजण्याचे एकक) वेगाने धावणार आहेत.