हिंदूंना जागृत करण्यासाठी त्यांना गुरुपरंपरेशी जोडणे आवश्यक ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ परिसंवादात ‘भारताची दिव्यता’ या विषयावर चर्चा !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

जयपूर (राजस्थान) – ज्याची प्रज्ञा जागृत होते, तो जागृत हिंदू ! हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रथम त्यांना गुरुपरंपरेशी जोडले गेले पाहिजे. हिंदूंनी साधना करून त्यांच्यातील दैवी आणि आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांनी दैवी शक्तीच्या सहाय्यानेच संघर्ष केला होता. मोगलांनी आक्रमण केल्यावर देशभरातील अनेक संतांनी त्या त्या ठिकाणच्या परंपरा जागृत ठेवल्या. साधना आणि धर्मबळ यांच्या आधारावर समाजाची जागृती आणि संघटन करणे, हाच हिंदूच्या समस्यांवरील उपाय आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या रूपात अवतरलेलाच आहे. आता हिंदूंनी अर्जुन आणि पांडव यांच्याप्रमाणे कार्य करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते ‘जम्बू टॉक्स कॉनफ्लूएन्स २०२१’ या परिसंवादाच्या प्रथम दिनी झालेल्या सत्रात बोलत होते.

येथील श्री. निधीश गोयल यांच्या ‘जम्बू टॉक्स’ या यू ट्यूब वाहिनीवर २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत ५ दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ डिसेंबर या दिवशी ‘भारताची दिव्यता’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.

या परिसंवादात प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार श्री. सच्चिदानंद शेवडे अन् भारताच्या वैभवशाली परंपरेचे संकलन करणार्‍या ‘द धर्मा डिस्पॅच’या संकेतस्थळाचे संस्थापक आणि मुख्य संपादक श्री. संदीप बालकृष्णन् यांनीही त्यांचे विचार मांडले. श्री. उपेंद्र मिश्रा यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

हिंदु धर्माविषयी शोधकार्य करणार्‍यांना हिंदूंनी पाठिंबा द्यावा ! – सच्चिदानंद शेवडे, प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार

डॉ. सच्चिदानंद शेवडे, लेखक-व्याख्याते

ब्रिटिशांनी भारतावर राज्य करून भारतातील हिंदूंच्या बुद्धीचे हरण केले. उदाहरणार्थ ‘शीखा ठेवायला अडचण नाही; पण ती गावंढळ दिसते’, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे हिंदूंनी शीखा ठेवणे सोडले. अशा प्रकारे हिंदूंच्या बुद्धीवरच त्यांनी घाला घातला. आता काही जण धर्माविषयी अभ्यास, तसेच शोधकार्य करत आहेत. त्यामुळे अशांना हिंदूंनी पाठिंबा द्यायला हवा.

धर्मविरोधी कृती केल्यास निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात यावे ! – संदीप बालकृष्णन्, संपादक, ‘द धर्मा डिस्पॅच’ संकेतस्थळ

श्री. संदीप बालकृष्णन

राज्यघटनेत ‘धर्म’ हा शब्द नाही. त्यामुळे ती अधिक काळ टिकू शकणार नाही, हे काहींनी राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा सांगितले होते. राज्यघटनेचा पाया बळकट असता, तर आतापर्यंत त्यात सुधारणा झाल्या नसत्या. इस्रायलच्या राज्यघटनेत ‘ज्यू’ धर्माविरोधात कृती केल्यास शासकीय निवडणुका लढण्यास अपात्र ठरवले जाते. हे भारतात झाले, तर भारतात राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश येऊ शकतो.