दळणवळण बंदीमध्ये चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगात सोलापूर येथील श्री. विक्रम लोंढे सहभागी होतात. त्यांच्यात आधीपासूनच साधकत्व आहे. सोलापूर येथील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
लेखिका : श्रीमती अलका योगेश व्हनमारे
१. विनयशील : ‘विक्रमदादांना कोणत्याही वेळी किंवा ते कितीही गडबडीत असतांना भ्रमणभाष केला, तरी ते नम्रतेने बोलतात.
२. उत्तम निरीक्षणक्षमता : त्यांची निरीक्षणक्षमता उत्तम आहे. ते अन्य साधकांचे निरीक्षण करून साधनेची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करतात.
३. ऐकण्याची वृत्ती : ते साधना सत्संगात सांगितलेली सूत्रे अत्यंत लक्षपूर्वक ऐकून नेमकेपणाने कृती करतात.
अ. एकदा एका सत्संगात स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेच्या संदर्भात ‘आपल्याकडून नेहमी घडू शकणारी चूक, म्हणजे चहाचा कप आपण लगेच विसळून न ठेवता तसाच जागेवर ठेवतो’, असे सांगितले होते. विक्रमदादांनी नंतरच्या सत्संगात सांगितले, ‘‘आता मी चहा पिऊन झाल्यावर लगेच कप धुऊन ठेवतो.’’
आ. एका सत्संगात ‘कुलदेवतेच्या नामजपाने मंद प्रारब्ध नष्ट होते’, असे सांगितल्यावर दादांनी ते समजून घेऊन गजर लावून नामजप करायला आरंभ केला. त्यांच्या नामजपात पुष्कळ वाढ झाली आहे.
४. सत्संगाविषयी भावपूर्णरित्या बोलणे : ‘सत्संग ऐकून काय वाटले ?’, असे सत्संगातील उपस्थित जिज्ञासूंना २ – ३ सत्संगांत विचारले होते. त्या वेळी दादांना सत्संग ऐकून १ – २ मासच झाले होते. दादांनी सर्व जिज्ञासूंच्या वतीने ‘हा सत्संग आमच्या हृदयाला भिडून आमच्यात कसा पालट होत आहे’, याविषयीची सूत्रे इतक्या सुंदर पद्धतीने सांगितली की, सत्संगात सर्वांचीच भावजागृती झाली.
५. महाशिवरात्री, गुढीपाडवा आणि श्रीरामनवमी यानिमित्त आयोजित केलेल्या नामजप सोहळ्यात सूत्रसंचालनाची सेवा भावपूर्णरित्या करणे
५ अ. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या नामजप सोहळ्यात सूत्रसंचालनाची सेवा देवाला अपेक्षित अशी होण्यासाठी शिवाचा ५ सहस्र नामजप करणे : महाशिवरात्रीनिमित्त सामुदायिक नामजप सोहळा आयोजित केला होता. ‘सोहळ्यात सूत्रसंचालन करण्यासाठी नवीन साधकांना संधी देऊया’, असे मला वाटले. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर प्रथम विक्रमदादांचे नाव आले. मी त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता या सेवेसाठी होकार दिला. प्रत्यक्षात त्यांनी यापूर्वी अन्य किंवा या प्रकारची कोणतीही सेवा केली नव्हती. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या नामजप सोहळ्यात सूत्रसंचालनाची सेवा देवाला अपेक्षित अशी होण्यासाठी त्यांनी शिवाचा ५ सहस्र नामजप केला. त्यांनी अतिशय तळमळीने आणि भावपूर्ण सूत्रसंचालन केले.
५ आ. नंतर गुढीपाडवा आणि श्रीरामनवमी या वेळीही नामसोहळा आयोजित केला होता. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या नामसोहळ्याच्या वेळी सूत्रसंचालन चांगले होण्यासाठी त्यांनी २ घंटे कुलदेवीचा नामजप केला. त्यांनी या वेळी अधिक चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले.
६. ‘देवाने इतक्या उच्च स्तराची सेवा दिली आहे, तर ती त्या स्तरावर व्हायला हवी’, असा भाव असणे : ‘आपल्याला देवाने इतक्या उच्च स्तराची सेवा दिली आहे, तर ती त्या स्तरावर व्हायला हवी’, असा त्यांचा भाव होता. मी त्यांना ‘सूत्रसंचालनाची सेवा चांगली झाली’, हे कळवण्यासाठी भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कुठे चुकलो असेन, तर सांगता का ? म्हणजे पुढच्या वेळी मी ही सेवा अधिक चांगली चांगल्या प्रकारे करू शकीन.’’
लेखिका : पू. (कु.) दीपाली मतकर
१. ‘विक्रमदादांमध्ये ‘नम्रता, शिकण्याची वृत्ती, न्यूनता घेणे, इतरांना साहाय्य करणे’, हे गुण आहेत.
२. शिकण्याची वृत्ती : एकदा दादांनी मला सांगितले, ‘‘मला परात्पर गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) जाणून घ्यायचे आहे. मी त्यांच्यासारखे आदर्श व्यक्तीमत्त्व कुठेच पाहिले नाही. मी घरात चांगली स्पंदने येण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे.’’
३. दादा नवीन असूनही ते साधनेत फार वर्षांपासून असल्याप्रमाणे त्यांचे आचरण आहे. त्यांची तशी कृती आणि सेवा परिपूर्ण करण्याची तळमळ जाणवते.’