अशांत दक्षिण कोरिया !

 संपादकीय

यशामागे धावतांना खरा आनंद गमावलेल्या दक्षिण कोरियाच्या दुःस्थिती वरून अन्य देशांनी शिकावे !

दक्षिण कोरिया येथील नागरिक निराशेतुन बाहेर पडण्यासाठी एकांतवासात

पैसा, प्रसिद्धी, बंगला, गाडी, नोकर-चाकर हे सर्व असले की, मनुष्य श्रीमंत असतो, असे म्हटले जाते. सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळण घालतात. स्वतःच्या कोणत्याही महत्त्वाकांक्षा तो या सगळ्यांच्या जोरावर पूर्णही करू शकतो. अर्थात् ही श्रीमंती केवळ ऐहिक स्वरूपाची झाली. ऐहिक श्रीमंत माणूस हा मनाने श्रीमंत असतोच असे नाही; कारण जरी तो चैनीत जगत असला, तरी मनाची श्रीमंती मिळवून देणारा आनंद, शांती आणि समाधान हे मात्र त्याच्याजवळ नसते. अर्थात् शांतीया गोष्टी पैशांनी विकत घेता येत नाहीत. त्यामुळे आयुष्यात केवळ ‘पैसा म्हणजे सर्वस्व’ असे असून चालत नाही. अशीच काहीशी गत दक्षिण कोरियातील लोकांची झालेली आहे. ते सर्वजण रात्रंदिवस पैसे कमावतात. अमाप खर्च करायलाही सिद्ध असतात; पण आज त्यांच्याकडे ‘शांतता’च नाही. आयुष्यात तणाव, दुःख, निराशा, मनोविकृती, पराकोटीची त्रस्तता हेच सर्व आहे. तेथील साधारणतः ७३ टक्के लोकसंख्या स्वतःला तणावग्रस्त समजते. हे प्रमाण सर्वाधिक असल्याने अशा स्थितीतील लोक त्यांचे जीवन कसे व्यतीत करत असतील ? आणि असे अशांत नागरिक असणारा देश कुठल्या मार्गाने वाटचाल करत असेल ? हे लक्षात येते. मान वर करायची म्हटली, तरी या देशातील नागरिकांसमोर समोर तणावच ‘आ’ वासून उभा आहे. ‘काहीही करा; पण आम्हाला शांती मिळवून द्या’, या प्रतीक्षेत असणारे ते सर्वजण शांती शोधण्यासाठी वाटेल तितका पैसा खर्च करायलाही सिद्ध आहेत. अनेक घंटे ते नदी किंवा समुद्र यांच्या किनार्‍यावर बसतात. शांतीसाठी कारागृहात जाण्यासही ते सिद्ध आहेत. दक्षिण कोरियातील अनेक चित्रपटगृहांनी एका लघुचित्रपटाद्वारे ‘आता ढगांमध्ये थोडी विश्रांती घ्या’, असे सांगितले. त्यातूनही अनेक लोक उत्साही झाले. ‘कुणीतरी आपले सांत्वन करावे’, असे या लोकांना सतत वाटत असते. प्रतिकूल आणि आपत्कालीन परिस्थितीत मन साहजिकच संवेदनशील अन् हळवे होते. त्यामुळे ते लगेच निराशेने ग्रासले जाते. यातूनच टोकाची विचारसरणी निर्माण होते. अशा स्थितीतच कधी कधी आत्महत्येसारखे भयंकर पाऊलही उचलले जाते. कमकुवत आणि अशांत मनातून कार्यकुशलता तरी कशी साधली जाणार ? त्यामुळे तेथील अनेक आस्थापनांमध्येही संघर्ष चालू आहे. ‘औद्योगिक जगात आत्महत्येमध्ये दक्षिण कोरिया सर्वांत पुढे आहे’, असे म्हटले जाते. प्रत्येक जण तेथे निराशेत आहे. ‘EMPTY MIND IS DEVILS WORKSHOP’ (अर्थ – रिकामे मन सैतानाचे घर) या इंग्रजीतील म्हणीप्रमाणे येथील नागरिकांची स्थिती झालेली आहे. प्रत्येकाला निराशावादी समस्या भेडसावत आहेच; पण त्यांचे सहकारीही याच मनस्थितीतून जात असल्याने कोण कुणाला साहाय्य करणार ? अशी दुर्दैवी वेळ आज त्यांच्यावर ओढवली आहे. दक्षिण कोरियामध्ये इतकी बिकट परिस्थिती निर्माण होण्यास कोरोना विषाणूचा प्रदीर्घ काळ, कामाचा असणारा प्रचंड ताण, तसेच भांडवलशाही कारणीभूत आहे. भांडवलशाही मानसिकतेमुळे तणावात आणखीनच वाढ होते. यशाची महत्त्वाकांक्षा अवश्य असावी; पण तिचा अतिरेक नको. यशाच्या मागे धावतांना खरा आनंद गमावून बसणे अशी दक्षिण कोरियातील लोकांप्रमाणे कुणाचीही गत व्हायला नको. दक्षिण कोरिया निराशेच्या गर्तेत आहेच; पण त्या जोडीला उत्तर कोरियाची स्थितीही काही वेगळी नाही. अण्वस्त्रांची निर्मिती, त्यांचा वापर यांच्याच मागे लागणार्‍या उत्तर कोरियाला त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. तेथील गरिबी वाढत आहे. किम जाँग उन या हुकूमशहामुळे असणारी धास्ती निराशाजनक वातावरणात दिवसेंदिवस भरच घालत आहे. नुकतीच माजी नेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त ११ दिवस हसणे आणि आनंदी रहाणे यांवरही तेथे बंदी घालण्यात आली आहे. स्वतःच्याच कुकर्मांमुळे आज हे दोन्ही देश जागतिक स्तरावर एकटे पडले आहेत.

उत्तर आणि दक्षिण कोरियातील लोकांना हवा असणारा आनंद आणि शांती विकत घेता येईल का ? तर नाही ! कारण आनंद ही पैशाने विकत घेण्यासारखी गोष्ट नाही. आनंद ही मनाची एक स्थिती आहे. ती निर्माण करावी लागते. अर्थात् पैसा, सत्ता आणि प्रसिद्धी यांच्यासाठी हपापलेल्या कोरियासारख्या देशातील नागरिकांना ते काय कळणार ? अन्य देशांना अण्वस्त्रांच्या निशाण्यावर ठेवणार्‍या देशातील नागरिकांना सुख, समाधान, शांती कधीच लाभू शकत नाही, हे खरे ! त्यासाठी दोन्ही देशांनी आत्मपरीक्षण करून परोपकार, मित्रत्व, तसेच सकारात्मक विचारसरणी या जीवनमूल्यांचाही अवलंब करायला हवा.

ध्यानधारणा

शांतीसाठी अध्यात्माची कास धरा !

तणाव दूर करून शांती मिळण्यासाठी बाह्य स्तरावरचे उपाय पुरेसे ठरणार नाहीत, तर त्यासाठी सर्वंकष स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. ध्यानधारणा, योगासने, ॐकारसाधना, तसेच ‘मेडिटेशन’ यांसह आत्मपरीक्षण असे सर्वच पर्याय वापरल्यास नागरिक शोधत असलेली शांती, समाधान आणि आनंद त्यांना विनासायास प्राप्त होऊ शकते. आज जागतिक स्तरावर पाहिल्यास अनेक देशांमध्ये थोड्याफार फरकाने का होईना, अशीच स्थिती आढळून येते. कोरोना, त्यात लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी यांमुळे अशा स्थितीत आणखीनच वाढ झाली. मानसिक आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या. लहान लहान मुलेही निराशाग्रस्त होऊ लागली. हे वास्तव भीषण आणि तितकेच भयंकरही आहे. कोणताही देश आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांच्या विकासाच्या पायावर उभा असतो. थोर ऋषिमुनींची परंपरा लाभलेला भारत या सर्व प्रतिकूल स्थितीला काही प्रमाणात तरी अपवाद आहे; कारण भारताला अध्यात्माचा पाया लाभला आहे. मनोभावे ईश्वराची आराधना करणारे श्रद्धावान नागरिक आज भारतात आहेत. भारत देशही आज अनेक संकटांमधून वाटचाल करत आहे. भारतीय कितीही अडीअडचणीत किंवा संकटात असले, तरी ते कोरियाच्या तुलनेत निश्चितच आनंदी आणि समाधानी आहेत. शांतीसाठी हपापलेले नाहीत. शांती आणि आनंद यांच्या प्राप्तीसाठी अध्यात्माची कास धरणे हाच सर्वश्रेष्ठ पर्याय आहे. उत्तर आणि दक्षिण कोरियाने आतातरी शहाणे होऊन भारताकडून अध्यात्म शिकावे आणि आपल्या नागरिकांना समाधान अन् शांती मिळवून द्यावी !