हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने मांडली भूमिका
मुंबई, २१ डिसेंबर (वार्ता.) – मागील प्रलंबित ५ आणि प्रस्तावित २१ अशी एकूण २६ विधेयके या अधिवेशनात मांडण्यात येतील. शक्ती विधेयकही चर्चेला आणण्याच्या सिद्धतेत गृहमंत्री आहेत. सभागृहातील सर्व चर्चांना उत्तरे देण्याची शासनाची सिद्धता आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. २२ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे.
या वेळी अजित पवार म्हणाले,
१. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या सावटामुळे गर्दी होऊ नये, यासाठी अधिवेशनाचा कालावधी अल्प ठेवण्यात आला आहे.
२. राज्य सरकारने दिलेल्या चहापानाच्या निमंत्रणावर विरोधकांनी बहिष्कार घातला. चहापानाच्या निमित्ताने चर्चा होते. लोकशाहीत ती महत्त्वाची आहे. आतापर्यंत प्रत्येक अधिवेशनात काही ना काही सूत्रांवरून विरोधक चहापानावर बहिष्कार टाकत आले आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे योग्य नाही.
३. इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळवून देण्यास राज्यशासन कुठेही न्यून पडलेले नाही. याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वत: विरोधी पक्ष आणि राजकीय नेते यांच्या बैठका घेतल्या आहेत. इतर मागासवर्गीय समाजाला योग्य ते प्रतिनिधीत्व देणे, ही शासनाची भूमिका आहे.
४. परीक्षेतील घोटाळ्यांविषयी चौकशी योग्य प्रकारे चालू आहे. त्यामुळे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे देण्याचा प्रश्नच नाही. अन्वेषणामध्ये शासनाचा राजकीय हस्तक्षेप नाही. अन्वेषणानंतर परीक्षा रहित करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.
५. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानामध्ये घेण्यावर विरोधकांचा आक्षेप असेल, तर त्यांना सभागृहात अविश्वासाचा ठराव आणण्याचा अधिकार आहे. त्यांनी सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकून दाखवावा.
हे अधिवेशन नागपूर येथे घेण्याचा राज्यशासनाचा विचार होता; मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव येण्यास मर्यादा असल्याने अधिवेशन मुंबईमध्ये घेण्यात येत आहे. पुढील अधिवेशन मात्र नागपूर येथे घेण्याचा शासनाचा विचार आहे.
विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, ‘मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली आहे. अधिवेशनाला ते प्रत्यक्ष उपस्थित रहातील’, असे अजित पवार म्हणाले.