कोल्हापूर – बेंगळुरू येथे काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. ही गोष्ट निंदनीय असून कर्नाटक सरकारने योग्य ती कारवाई करावी; अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रातील शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर खपवून घेणार नाहीत, अशी चेतावणी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा कोल्हापूरचे शिवसेना नेते रविकिरण इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
इंगवले यांनी प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे दैवत असून त्यात कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करणे चुकीचे आहे. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनीच तत्कालीन परिस्थितीमध्ये बेंगळुरू या शहराची रचना केली आहे, याचे तरी भान समाजकंटकांनी ठेवावे. आज कर्नाटकमधील सहस्रो नागरिक महाराष्ट्रात रोजगारासाठी वास्तव्यास असून त्यांच्याशी प्रत्येक मराठी माणूस प्रेमाने आणि आपुलकीने वागत आहे. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आम्हालासुद्धा जशास तसे वागण्यास प्रवृत्त करू नका.’’