संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

झोकून देऊन आणि नेतृत्व घेऊन सेवा करण्यासह व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्ण करणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष अष्टमीच्या शुभदिनी, जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाली एक रणरागिणी !

कु. प्रियांका लोणे (उजवीकडे) यांना श्रीकृष्णाचे चित्र देऊन त्यांचा सत्कार करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

संभाजीनगर, २० डिसेंबर (वार्ता.) – नेतृत्व घेऊन झोकून देऊन सेवा करणार्‍या, तळमळीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणार्‍या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या संभाजीनगर येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे (वय ३३ वर्षे) या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, असे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी घोषित केले. ११ डिसेंबर २०२१ या दिवशी उत्तर महाराष्ट्र विभाग स्तरावरील ‘ऑनलाईन गुरुमहिमा’ सत्संगात त्यांनी ही घोषणा केली. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्रीकृष्णाचे चित्र देऊन कु. प्रियांका लोणे यांचा सत्कार केला. दुर्गाष्टमीच्या शुभदिनी ही आनंदवार्ता मिळाली आणि सर्वांचीच भावजागृती झाली.

‘आमची प्रगती व्हावी’, या सद्गुरु जाधवकाकांच्या तळमळीमुळे मी हा आनंद अनुभवू शकले ! – कु. प्रियांका लोणे

कु. प्रियांका लोणे

‘माझ्यात पुष्कळ स्वभावदोष आणि अहंचे पैलू आहेत. मला अजून पुष्कळ प्रयत्न करायचे आहेत. गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि सद्गुरु जाधवकाका यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात करून घेतलेले प्रयत्न यांमुळे ही भेट देवाने दिली आहे. ‘आम्हा साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, या सद्गुरु जाधवकाकांच्या तळमळीमुळे मी हा आनंद अनुभवू शकले. परात्पर गुरुदेवांच्या प्रीतीमुळेच हे सगळे होत आहे.

सद्गुरु जाधवकाका ‘चित्तशुद्धी सत्संगा’च्या माध्यमातून साधनेच्या स्थितीची जाणीव करून देत असल्यामुळे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करून गुरुमाऊलीला अपेक्षित असे घडायचे आहे’, ही प्रेरणा मिळाली. स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न प्रत्येक सप्ताहात करवून घेतल्याने प्रक्रियेत पुष्कळ साहाय्य झाले. प्रयत्नांची गती वाढवण्यासाठी आणखी तळमळीने प्रयत्न करवून घ्यावे, ही गुरुचरणी प्रार्थना !’

कु. प्रियांका लोणे यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत

१. कु. प्रियांकाचे साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढले आहेत ! – सौ. पद्मा लोणे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के.) (कु. प्रियांका लोणे यांची आई)
पूर्वी कु. प्रियांकाकडून साधनेचे प्रयत्न अपेक्षित असे होत नव्हते; पण २-३ मासांपासून कु. प्रियांकाचे साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढले आहेत. ‘ती साधनेला प्राधान्य देत आहे’, असे जाणवत होते. गुरुमाऊली आणि सद्गुरु जाधवकाका यांनी तिच्याकडून सर्व साधनेचे प्रयत्न करून घेतले, त्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता !

२. ‘कु. प्रियांकामध्ये पुष्कळ पालट जाणवत होता. ती पुष्कळ तळमळीने प्रयत्न करत होती. २ दिवसांपासून ‘तिची आध्यात्मिक पातळी वाढली आहे’, असे वाटत होते.’
– श्री. अविनाश लोणे (कु. प्रियांका लोणे यांचे वडील) आणि – कु. प्रतिमा लोणे (कु. प्रियांका लोणे यांची बहीण)

३. ‘ताईची आध्यात्मिक पातळी घोषित झाली, हे ऐकून पुष्कळ आनंद झाला आणि गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत आहे.’ – श्री. अवधूत लोणे (कु. प्रियांका लोणे यांचा भाऊ)

४. कु. प्रियांका सेवांचा व्यापक विचार करते ! – कु. चैताली डुबे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, कु. प्रियांका लोणे यांची सहसाधिका)
गेल्या अनेक मासांत कु. प्रियांकाचे प्रक्रियेचे प्रयत्न पुष्कळ वाढले आहेत. कितीही सेवा असल्या, तरी ती पहाटे लवकर उठून व्यष्टी साधनेचे प्रयत्न ध्येय ठेवून करते. तिला कितीही सेवा असली, तरी प्रत्येक साधकाला ती साहाय्य करण्यासाठी तत्पर असते. सेवाकेंद्रातही तिने पुष्कळ पालट केला आहे. ती सेवांचा केवळ जिल्ह्यापुरता विचार न करता पुढाकार घेऊन व्यापक स्तरावर विचार करते.

५. कु. प्रतीक्षा कोरगावकर (कु. प्रियांका लोणे यांची सहसाधिका)
‘आज मला कुटुंबातील व्यक्तींची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर जसा आनंद होतो, तसा आनंद झाला आहे. स्वतःचे साधनेचे प्रयत्न वाढवण्यासाठी मला प्रेरणा मिळाली.’
– कु. प्रतीक्षा कोरगावकर (कु. प्रियांका लोणे यांची सहसाधिका)


सद्गुरु नंदकुमार जाधव यांना जाणवलेली कु. प्रियांका लोणे यांची गुणवैशिष्ट्ये !

सद्गुरु नंदकुमार जाधव

१. चुकांविषयी संवेदनशीलता

१ अ. चुका प्रांजळपणे सांगणे : ‘साधारणपणे ६ वर्षांपूर्वी मी संभाजीनगर जिल्ह्यात आल्यानंतर तेथे प्रथमच सत्संग आयोजित केला होता. त्या वेळी ‘सत्संगात चुका सांगितल्या जातील’, हे प्रियांकाच्या लक्षात आल्यावर ती सत्संगाला न थांबता तिच्या घरी पुण्याला गेली. त्या वेळी सत्संगात चुका सांगण्याची तिची सिद्धता नसल्याचे लक्षात आले; परंतु आता मात्र ती स्वतःकडून झालेल्या चुका प्रांजळपणे सांगते.

१ आ. चूक झाल्यास क्षमा मागणे : एकदा ती एका साधकाला त्याच्या चुकीविषयी बोलली; पण नंतर तिला तिच्या चुकीची पुष्कळ खंत वाटली. तिने सांगितले, ‘‘मी त्या साधकाला प्रतिक्रियात्मक बोलले. माझी चूक झाली. मी असे बोलायला नको होते.’’ ती हे सांगत असतांना तिच्या डोळ्यांत पाणी आले होते आणि तिचा कंठ दाटून आला होता. तिच्याकडून एखादी चूक झाल्यास ती लगेच चूक सांगून क्षमा मागते.

२. व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न सातत्याने आणि गांभीर्याने करणे

मी हिंदु जनजागृती समितीच्या सर्व समन्वयकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतो. अन्य समन्वयकांच्या तुलनेत प्रियांकाचे साधनेचे प्रयत्न अधिक असतात. मी सर्वांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी १२ स्वयंसूचना सत्रे करायला सांगितली होती. तेव्हा केवळ तीच १२ स्वयंसूचना सत्रे करत असल्याचे आढळले. ती सत्संगात भावपूर्ण प्रार्थना आणि कृतज्ञता सांगते. ती व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न गांभीर्याने करते.

३. नेतृत्वगुण

एका शहरातील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी प्रमुख वक्ते असलेल्या मान्यवरांना भेटण्यासाठी युवकांची पुष्कळ गर्दी झाली होती. त्या वेळी ‘त्यांना सभेला वेळेत पोचता यावे’, यासाठी प्रियांकाने प्रमुख वक्ते थांबलेल्या वास्तूत अन्य युवकांनी येऊ नये; म्हणून तेथील लोखंडी दार (‘गेट’) बंद करून दुसर्‍या मार्गाने मान्यवर वक्त्यांना बाहेर काढले. त्यामुळे त्यांना वेळेत सभास्थानी पोचता आले. प्रियांका यांच्यात ‘समयसूचकता, पुढाकार घेऊन कृती करणे, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि नियोजनकौशल्य’, असे नेतृत्वाचे गुणही आहेत.

४. धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना धर्मकार्याशी जोडून ठेवणे

प्रियांकाने जालना येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या वेळी तेथील अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आणि उद्योजक यांना सभेच्या सेवा अन् धर्मकार्यार्थ अर्पण घेणे या निमित्ताने जोडून ठेवले. त्यामुळे धर्मप्रेमी अन्य सेवाही करू लागले. तिने आसपासच्या गावांतील धर्मप्रेमींना ‘सभेच्या प्रसारबैठका आयोजित करणे आणि तेथील लोकांना सभेला घेऊन येणे’, हे दायित्व देऊन त्यांच्याकडून सेवा करवून घेतली. ती नियमित त्यांच्या संपर्कात राहून त्यांना साधनेची सूत्रे सांगते. त्यामुळे तेथे ‘सनातन पंचांग आणि आकाशकंदिल’ यांची मागणी घेणे आणि ते वितरित करणे’ सहज शक्य झाले. ती समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनाही संपर्क करू शकते. तिचे संभाजीनगर येथील लोकप्रतिनिधी आणि कीर्तनकार यांच्याशी चांगले संबंध आहेत. ते तिला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि समितीला साहाय्यही करतात. तिने या सर्वांच्या प्रकृतीचा, त्यांच्या कार्यशैलीचा पूर्ण अभ्यास केलेला असतो. तिचा अन्य संघटनांच्या कार्याविषयीही अभ्यास आहे.

५. प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न करणे

प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न करायला सांगितले, तेव्हा तिला ‘तिच्यात प्रेमभाव अल्प आहे’, याची जाणीव झाली. ‘ती घरी तिच्या आई-बाबांना साहाय्य करू लागली. त्यांना भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करू लागली. धर्मप्रेमींची विचारपूस करणे, त्यांचे कौतुक करणे, सेवाकेंद्रात तिच्यासह असणार्‍या साधिकेला तिच्या रुग्णाइत स्थितीत साहाय्य करणे आणि सेवाकेंद्रातील सेवांमध्ये साहाय्य करणे’, असे प्रयत्न तिने चालू केले. एकदा ‘नाशिक येथील हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना त्रास होत आहे’, हे कळल्यावर तिने त्यांच्यासाठी नामजपादी उपाय विचारून घेतले. अशा प्रकारे प्रेमभाव वाढवण्याचे प्रयत्न तिने आरंभ केले.’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२७.११.२०२१)


कु. प्रियांका लोणे यांची संभाजीनगर येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. दिनेश बाबते

१. इतरांना साहाय्य करणे : ‘प्रियांकाताईला अडचण सांगितल्यास ती सकारात्मक राहून आपले बोलणे ऐकते आणि आपली अडचण सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ताईच्या समवेत सेवा करतांना ताण जाणवत नाही.

२. प्रियांकाताईचा सर्वांत प्रकर्षाने जाणवणारा गुण म्हणजे तिचे नेतृत्वकौशल्य आहे.

३. उत्तम संपर्क कौशल्य : ताईला हिंदु जनजागृती समितीचे कार्य असलेल्या गावांविषयी संपूर्ण माहिती (तेथील लोकसंख्या, सामाजिक आणि धार्मिक स्थिती, गावातील संत, मठ, यांविषयीची माहिती) असते. ती नियमित त्यांच्या संपर्कात असते. यातून तिचे सेवेशी संबंधित संपर्ककौशल्य सतत अनुभवावयास मिळते.

४. संघटन कौशल्य

अ. ती स्वतः सकारात्मक राहून साधक आणि धर्मप्रेमी यांची त्यांच्या प्रकृतीनुसार सेवेसाठी निवड करते. ती प्रत्येकाचा गुण आणि कौशल्य यांनुसार त्यांना कार्यात सहभागी करून घेते आणि प्रोत्साहित करते.

आ. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध मोहिमांसाठी प्रशासकीय अनुमती काढणे आणि उपक्रमांच्या माध्यमातून अन्य मान्यवरांना समितीच्या कार्यात जोडणे, याविषयी तिची तळमळ असते.’

सौ. अक्षरा दिनेश बाबते (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

१. कु. प्रियांकाताईमध्ये जाणवलेले पालट

१ अ. प्रेमभाव वृद्धींगत होणे

अ. ‘आधी ताई सेवेपुरतेच बोलायची. ती मोकळेपणाने बोलत नव्हती; पण आता तिच्यात पुष्कळ पालट जाणवतो. आता आमच्यात आध्यात्मिक मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.

आ. पूर्वी ताई निवासासाठी घरी आल्यावर ‘ती आणि तिची सेवा’ असे असायचे. आता यात पुष्कळच पालट जाणवत आहे. आता ती स्वतःच्या सेवा सांभाळून तत्परतेने आश्रमसेवेत साहाय्य करते. ती मला सांगते, ‘‘ताई, तू तुझी सेवा कर. मी अन्य सांभाळते.’’

१ आ. सकारात्मकतेत वाढ होणे : पूर्वी ‘ताई तिचे मत मांडायची आणि त्यावर ठाम रहायची’, असे जाणवायचे. आता ती सकारात्मक राहून इतरांचा विचार करते आणि इतरांची अडचण पाहून तिची कृती होते.

१ इ. साधकांना आधार वाटणे : काही मासांपासून ताईमध्ये प्रेमभाव पुष्कळ वाढल्याचे साधकांना जाणवते. त्यामुळे ताईने कुठल्याही नवीन सेवेविषयी साधकांना विचारल्यावर साधक लगेच होकार देतात. ताई समवेत असल्यामुळे तिचा साधकांना आधार वाटतो.

१ ई. ताईचे भावाच्या स्तरावर प्रयत्न वाढल्याचे जाणवते.’

सौ. छाया देशपांडे

१. प्रेमभाव : ‘आम्ही दोन कुटुंबांतील एकूण सात जण आणि एक साधिका असे सर्वजण ‘कोरोना’चा संसर्ग झाल्यामुळे रुग्णाईत असतांना प्रियांकाताई २ मास सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवत होती. ती प्रत्येकाच्या पथ्यानुसार जेवणाच्या वेगवेगळ्या पिशव्या करून प्रतिदिन आम्हाला वेळेच्या आधी जेवण आणून द्यायची.

२. सुगरण : ताई सात्त्विक आणि रुचकर जेवण बनवत असे. तिचा अंदाज योग्य असायचा आणि कधीच काही न्यून पडायचे नाही कि शेष रहायचे नाही. हे सर्व करत असतांना ती नेहमी आनंदी असायची. ‘आम्ही जणू आश्रमातच रहात आहोत’, असे आम्हाला वाटायचे. तिचा तोंडवळा पाहून ‘तिच्यावर श्री अन्नपूर्णादेवी प्रसन्न आहे’, असेच आम्हाला वाटायचे.

३. तत्त्वनिष्ठता : ताई कधी कोणा व्यक्तीमध्ये अडकत नाही किंवा कोणालाही व्यक्तीनिष्ठ बनवत नाही. ती नेहमी तत्त्वनिष्ठ असते. ‘गुरुदेवांना अपेक्षित साधक घडवणे’, यासाठी ताईचा नेहमी प्रयत्न असतो.

४. तत्परतेने उपाययोजना सांगणे : ताईला एखादे सूत्र सांगितले की, ती त्या सूत्राचे प्राधान्य बघून त्याविषयीच्या उपाययोजना तत्परतेने सांगते. सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांना काही विचारून घ्यायचे असेल, तर ती तत्परतेने विचारून सांगते. ‘ताईला काही विचारले की, लगेच उपाययोजना मिळेल’, अशी निश्चिती असते.

कु. चैताली डुबे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : ‘प्रियांकाताई पहाटे उठून अधिकाधिक नामजपादी उपाय पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य पुष्कळ वाढले आहे. अतिरिक्त आश्रमसेवा असतांना तिने कधी व्यष्टी आणि समष्टी सेवा यांत सवलत घेतली नाही. ती व्यष्टी साधनेच्या अंतर्गत सर्व प्रयत्न चिकाटीने करत आहे.

२. प्रेमभाव : एकदा मी रुग्णाईत असल्याने माझे पाणी पिण्याकडे लक्ष नव्हते. त्या वेळी ताईने स्वतःहून मला ‘अगं, तू आज पाणी मागितलेच नाहीस. तुला पाणी देऊ का ?’, असे विचारून मला पाणी प्यायला सांगितले. त्या वेळी ‘माझ्यापेक्षा तिलाच माझी काळजी अधिक आहे’, असे मला वाटले आणि माझी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. माझ्या रुग्णाईत अवस्थेत ताईच सर्व आश्रमसेवा करून माझी काळजी घेत होती.’

सौ. कल्पना (६२ टक्के आध्यात्मिक पातळी) आणि श्री. महेश देशपांडे

१. सेवेत व्यस्त असतांनाही स्वतःहून इतरांना साहाय्य करणे

मे मासाच्या पहिल्या आठवड्यात माझ्या मोठ्या मुलीचा वाढदिवस होता. त्या वेळी माझ्या नणंदेच्या यजमानांचे निधन झाले असल्याने आम्ही तिच्यासाठी काही केले नव्हते. तेव्हा प्रियांकाताईने माझ्या मुलीला तिच्या आवडीचा पदार्थ करून दिला.

२. कठीण प्रसंगात स्थिर राहून देवाचे साहाय्य घेणे : प्रकृती बरी नसल्यामुळे ताईच्या आजीला (आईच्या आईला) एप्रिल मासात रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ‘कोरोना’ महामारीच्या वातावरणात कुणालाही रुग्णालयात अथवा बाहेर जाणे अवघड होते. त्याही परिस्थितीत संभाजीनगर येथील सेवांमध्ये कुठलाही खंड न पडू देता ताई घरची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळत होती. त्यानंतर दोनच दिवसांनी तिच्या आजीचे निधन झाले. त्या वेळी ताईने घरी न जाता सेवेला प्राधान्य दिले. ताईने नातेवाइकांनाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देऊन एकत्र न येण्याविषयी सांगितले. यावरून ‘कठीण प्रसंगातही भावनेत न अडकता स्थिर राहून देवाचे साहाय्य कसे घ्यायला पाहिजे ?’, हे आम्हाला शिकायला मिळाले.

३. ‘हिंदु राष्ट्र लवकर यावे’, याची तळमळ असणे : ‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे हिंदु राष्ट्र लवकर यावे’, अशी ताईची पुष्कळ तळमळ आहे. त्यासाठी ती साधक आणि धर्मप्रेमी यांना व्यष्टी अन् समष्टी साधना यांत सतत साहाय्य करते. ती प्रसंगात अडकून रहाणार्‍या साधकांना योग्य दृष्टीकोन देऊन त्यातून बाहेर काढण्यासाठी सदैव प्रयत्नरत असते. ‘साधक आणि धर्मप्रेमी यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून कृतीशील करून त्यांना देवाच्या अनुसंधानात कसे ठेवता येईल ?’, याकडे ताईचे लक्ष असते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (१८.७.२०२१)