योगी आदित्यनाथ यांचा वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सहज विजय होईल ! – पी.व्ही.आर्. नरसिंह राव, अमेरिकास्थित प्रख्यात ज्योतिषी

पी.व्ही.आर्. नरसिंह राव

नवी देहली – पी.व्ही.आर्. नरसिंह राव हे अमेरिकास्थित ज्योतिषी आहेत. ते चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे पदवीधर असून त्यांनी अमेरिकेतील ह्युस्टन येथील राईस विद्यापिठात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी कोरोना महामारी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाची अचूक भविष्यवाणी केली होती. अलीकडेच त्यांनी भारतातील आणि जगातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींविषयीचे भविष्यही वर्तवले आहे. पुढील वर्षी म्हणजेच वर्ष २०२२ मध्ये उत्तरप्रदेशची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहज विजयी होतील, असे भविष्य राव यांनी वर्तवले आहे. वर्ष २०३०-३१ मध्ये विश्वयुद्ध होणार असून योगी आदित्यनाथ भारताचे नेतृत्व करतील, असेही त्यांनी वर्तवले आहे.

जागतिक घडामोडींविषयी भविष्य !

पुढील १०-१५ वर्षांत तिबेट स्वतंत्र होईल, तर चीन अनेक भागांमध्ये विभागला जाईल. दुसर्‍या महायुद्धाच्या नंतर युनायटेड किंगडम रसातळाला गेला. येणार्‍या काळात तीच स्थिती अमेरिकेचीही होणार आहे. अफगाणिस्तानची स्थिती सुधारण्यासाठी वर्ष २०४२ उजाडेल. मध्य पूर्व भागात शक्तीशाली देशांकडून मोठ्या प्रमाणात उलथापालथ होईल आणि त्याचे प्रमुख केंद्र इराक असेल. पाकिस्तानला वर्ष २०२२ मध्ये अत्यंत वाईट काळ येईल. तालिबानी अंतकवादामुळे पाकिस्तान आणि चीन यांच्यासमोर मोठ्या समस्या उभ्या रहातील. चीनमधील शिनझियांग प्रांतामध्ये तालिबानचे समर्थन असलेल्या उघूर मुसलमानांमुळे पुष्कळ अशांती पसरेल.

संपूर्ण विश्व सनातन धर्माकडे वळेल !

येणार्‍या काळात धर्मत्यागी आणि नास्तिक लोक सर्वच धर्मांत वाढतील. ख्रिस्ती पंथाला वाईट दिवस येतील, तर इस्लामला अत्यंत वाईट काळ येईल. येणार्‍या काळात होणारा सर्वनाश हा प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठीच असेल. सर्व उलथापालथ संपल्यानंतर संपूर्ण विश्व स्थिर आणि धार्मिक जीवनशैलीकडे म्हणजेच सनातन धर्माकडे वळेल !