महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी केलेल्या संगीत दौर्‍याच्या वेळी विविध मान्यवर कलाकारांनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना साधकांचे जाणवलेले वेगळेपण !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी केलेल्या संगीत दौर्‍याच्या वेळी विविध मान्यवर कलाकारांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य आवडल्यावर त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना साधकांचे जाणवलेले वेगळेपण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ‘स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती’, ही अष्टांग साधना सर्व साधकांच्या अंतरंगात रुजवली. त्याचाच परिणाम म्हणून समाजातील लोकांनाही साधकांमधील साधकत्व सहजतेने आणि प्रकर्षाने लक्षात येते. आम्ही संगीत दौर्‍यासाठी मुंबई आणि पुणे येथील मान्यवर कलाकारांच्या भेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा आम्हाला याचा अनुभव आला. त्या कलाकारांनी साधक आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य यांविषयी व्यक्त केलेले सकारात्मक अभिप्राय या लेखात देत आहोत.

कु. तेजल पात्रीकर

१. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य आणि संगीताच्या माध्यमातून साधना यांविषयी मान्यवर कलाकारांनी कौतुक करणे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करत असलेले संगीत-संशोधनाचे आणि संगीत-साधनेचे सर्व कार्य जाणून घेतल्यावर सर्वच कलाकारांनी कार्याची स्तुती केली, तसेच ‘संगीतातून ईश्वरप्राप्ती’ हा भाग त्यांना पुष्कळच आवडल्याचे लक्षात आले. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.

१ अ. ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. निषाद बाकरे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य आवडल्याचे आणि स्वतःही त्यात सहभागी होण्यास सिद्ध असल्याचे सांगणे : ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. निषाद बाकरे यांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून आम्हाला दोन ते अडीच घंटे दिले. त्यांनीही आवर्जून सर्व कार्य जाणून घेतले. आमच्याशी बोलतांना ते आम्हाला म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वीच ‘विविध कलांच्या पुनरुत्थानासाठी काहीतरी करायला हवे’, असा विचार माझ्या मनात येत होता.’’ महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सर्व कलांतील कार्य जाणून घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘मला ‘असे कार्य व्हायला हवे’, असे वाटत होते आणि तुम्ही त्याचप्रमाणे कार्य करत आहात.’’ हे सर्व कार्य ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला, तसेच ‘माझ्याकडून होईल, तो सहभाग द्यायला मी सिद्ध आहे’, असा अभिप्रायही त्यांनी दिला. आम्ही तेथून निघतांना ‘ठाण्यात येणे झाले, तर पुन्हा आमच्या घरी या’, असेही ते आम्हाला म्हणाले.

१ आ. डॉ. सुनील शास्त्री यांनी भ्रमणभाष करून ‘तुमच्याशी झालेली भेट फार छान आणि आनंददायी होती’, असे सांगणे : पं. नित्यानंद हळदीपूर यांच्या भेटीच्या वेळी मां अन्नपूर्णादेवींवर ग्रंथ लिहिणारे आणि आध्यात्मिक साधना करणारे मुंबई येथील डॉ. सुनील शास्त्री यांच्याशीही आमचे संगीताविषयी संभाषण झाले होते. दुसर्‍या दिवशी डॉ. शास्त्री यांनी मला भ्रमणभाष करून पुन्हा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘‘कालची भेट फार छान आणि आनंददायी झाली.’’

१ इ. ‘तुमच्याशी अधिक वेळ बोलायचे आहे’, असे सांगून प्रसिद्ध बासरीवादक पं. रोणु मुजुमदार यांनी अमेरिकेहून परत आल्यावर भेटण्यासाठी वेळ देणे : प्रसिद्ध बासरीवादक पं. रोणु मुजुमदार यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले. त्या वेळी कार्य ऐकून ते प्रभावित झाले आणि म्हणाले, ‘‘मला तुमच्याशी अधिक वेळ बोलायचे आहे.’’ ते दुसर्‍याच दिवशी ७ दिवसांसाठी अमेरिकेला जाणार होते. त्यामुळे तिकडून आल्यावर आम्ही पुण्यात असतांना ते आम्हाला भेटले.

बर्‍याच कलाकारांनी ‘आजपर्यंत असा विषय घेऊन आमच्याकडे कुणी आले नाही. तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात’, असे सांगितले.

श्री. गिरिजय प्रभुदेसाई

२. परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यमय कार्याचा कलाकारांवर जाणवलेला प्रभाव !

२ अ. बहुतेक कलाकारांनी भेट संपल्यावर आदराने दारापर्यंत पोचवण्यासाठी येणे : बरेच कलाकार आम्ही त्यांच्या घरून निघतांना आम्हाला बाहेर दारापर्यंत सोडायला यायचे. तसे बघायला गेलो, तर आम्ही या क्षेत्रात एकदम नवीन आहोत; पण तरीही हे कार्य आवडल्यामुळे ते प्रभावित होऊन आम्हाला बाहेर दारापर्यंत आदराने सोडायला यायचे. ही केवळ परात्पर गुरुदेवांच्या चैतन्यमय कार्याची पावतीच होती.

२ आ. कलाकारांची भेट घेऊन साधक परत निघत असतांना कलाकारांच्या तोंडवळ्यात पालट दिसून ते आनंदी दिसणे आणि त्यांच्या डोळ्यांत आदरभाव जाणवणे : आम्ही कलाकारांकडे संपर्काला गेल्यावरचा त्यांचा तोंडवळा आणि संपर्क करून त्यांच्या घरून परत निघतांनाचा त्यांचा तोंडवळा, यांमध्ये पुष्कळ पालट जाणवायचा. संपर्कात सत्संगच होत असल्यामुळे नंतर त्यांच्यामध्ये सकारात्मकता जाणवून त्यांच्या तोंडवळ्यावरचा आदर आणि आनंद हा अगदी बघण्यासारखा असायचा.

२ इ. कलाकारांनी आतापर्यंत त्यांना आलेल्या अनुभूती इतर कुणालाही न सांगणे आणि त्या अनुभूती साधकांना मनमोकळेपणाने सांगणे : काही कलाकारांनी ‘आजपर्यंत आम्हाला संगीतात आलेल्या या अनुभूती आम्ही कोणाशीही बोललो नव्हतो; परंतु आज तुम्हाला सांगितल्या गेल्या’, अशा प्रकारच्या सकारात्मक प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केल्या.

२ ई. बर्‍याच कलाकारांनी ‘आश्रमात येतो’, असे आवर्जून सांगितले.

२ उ. कलाक्षेत्रातील महनीय कलाकारांनी वेळ देऊन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेणे : आम्ही संगीत क्षेत्रात अगदी नवीन असूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मोठमोठे कलाकार आम्हाला वेळ देऊन सर्व कार्य जाणून घेत होते. ही केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.

२ ऊ. पं. शैलेश भागवत यांनी प्रेमाने रात्रीच्या जेवणाचा डबा करून देणे : पं. बिसमिल्ला खाँ यांच्या घरी राहून ४० वर्षे शहनाई शिकणारे शहनाईवादक पं. शैलेश भागवत यांना भेटण्यासाठी प्रथमच आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या पत्नीला ताप असतांनासुद्धा त्यांनी अतिशय प्रेमाने आमच्यासाठी रात्रीचा जेवणाचा डबा करून दिला.

२ ए. खैरागड येथील ‘इंदिरा संगीत कला विश्वविद्यालय’ या विद्यापिठातील संग्रहालयात कार्यरत असलेले श्री. प्रखर सिंह यांनी प्रथम भेटीतच साधकांना त्यांच्या घरी नेणे आणि  त्यांच्या आईने ‘पुढच्या वेळी आमच्या घरीच निवासाला या’, असे सांगणे : खैरागड येथील ‘इंदिरा संगीत कला विश्वविद्यालय’ या विद्यापिठात आम्हाला तेथील सर्व विभाग आणि परिसर दाखवणारे विद्यापिठातील संग्रहालयात कार्यरत असलेले श्री. प्रखर सिंह यांनी शेवटच्या दिवशी आम्हाला त्यांच्या घरी नेले. त्या वेळी त्यांची आई प्रथम भेटीतच आम्हाला म्हणाली, ‘‘पुढच्या वेळी तुम्ही इथे आलात, तर आमच्या घरीच निवासाला या.’’

२ ऐ. खैरागड येथील एका सिद्धपुरुषाच्या मठाच्या व्यवस्थापकांनी प्रथम भेटीतच मठात रहाण्यास येण्यास सांगणे : खैरागड येथील ‘इंदिरा संगीत कला विश्वविद्यालया’पासून काही अंतरावर येथील एक सिद्धपुरुष रुख्खडस्वामी यांचा मठ आहे. त्याला आम्ही भेट दिली. त्या वेळी पहिल्या भेटीतच तेथील व्यवस्थापक आम्हाला म्हणाले, ‘‘येथून पुढे तुम्ही केव्हाही इकडे आलात, तर या मठात येऊन रहा. आम्ही तुमची सर्व व्यवस्था करू.’’ परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र त्यांना दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘मी यांना आधी कुठेतरी पाहिले आहे’, असे मला जाणवत आहे.’’

२ ओ. चंपारण्य येथील स्वामी वल्लभाचार्यांच्या जन्मस्थळी असलेल्या व्यवस्थापकांनी प्रथम आयत्यावेळी चित्रीकरण करण्याची अनुमती देण्यास असमर्थता दर्शवणे आणि थोड्या वेळाने स्वतःच येऊन अनुमती देणे : चंपारण्य (छत्तीसगड) येथील स्वामी वल्लभाचार्य यांच्या जन्मस्थळी गेल्यावर तेथे चित्रीकरण करण्यासाठी आम्ही तेथील व्यवस्थापकांना अनुमती मागितली. ‘आधी अनुमती पाठवावी लागते. आम्ही एवढ्या लवकर तुम्हाला अनुमती देऊ शकत नाही’, असे ते आम्हाला म्हणाले. त्यानंतर आम्ही सर्व साधकांनी मनातल्या मनात प्रार्थना केली. त्यानंतर अर्धा घंट्यातच त्या व्यवस्थापकांनी आम्हाला ‘तुम्ही चित्रीकरण करू शकता’, असे सांगितले.

या सर्व प्रसंगांवरून परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून करत असलेल्या अलौकिक कार्याचा आम्ही अनुभव घेतला आणि अजूनही घेत आहोत. ते संगीत साधनेच्या या प्रवासात महनीय अशा संगीत कलाकारांच्या आमच्याशी भेटी घडवून आणून आम्हाला शिकवत आहेत आणि आम्हा साधकांकडून संगीत-साधना करवून घेत आहेत. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

– कु. तेजल पात्रीकर आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.९.२०१९)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक