सिंधुदुर्गात कोरोनामुळे पालक गमावलेली २६६ बालके, तर ५६८ विधवा
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – कोरोनामुळे दोन्ही किंवा १ पालक गमावलेल्या बालकांना वारसप्रमाणपत्र देण्याविषयी तातडीने कार्यवाही करा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी आणि संरक्षण यांसाठी जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक १५ डिसेंबर या दिवशी घेण्यात आली. या बैठकीला विधी आणि सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी. म्हालटकर, बालकल्याण समितीचे अध्यक्ष पी.डी. देसाई, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. रूपाली पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी, महिला अत्याचार निवारण कक्षाच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या, ‘‘पालक गमावलेल्या बालकांचे शालेय शुल्क माफ करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. अनाथ प्रमाणपत्रासाठी उर्वरीत ४ बालकांचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. विधवा महिलांना रोजगार प्रशिक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी. त्यासाठी कौशल्य विकास, जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याशी समन्वय साधावा. विधवांना ‘संजय गांधी निराधार योजने’चा लाभ देण्यासाठी तहसीलदार, तसेच उपविभागीय अधिकारी यांना पत्र पाठवावे. लाभार्थ्यांचा कोणत्या योजनांमध्ये सामवेश होऊ शकतो, याची तपासणी करून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.’’
जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी ‘जिल्ह्यात कोरोनामुळे एका पालकाचा मृत्यू झाला, अशी बालके २४८ असून दोन्ही पालकांचा मृत्यू झाला अशी १८, अशी एकूण २६६ बालके आहेत, तर कोरोनामुळे पती गमावलेल्या ५६८ विधवा आहेत’, अशी माहिती दिली.