एकीकडे खासदार निधी बंद असतांना केंद्र सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मात्र खर्च केले १ सहस्र ६९८ कोटी रुपये ! – खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत टीका

शिवसेनेचे ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

नवी देहली – कोरोनाच्या संकटात देशातील डॉक्टरांनी सक्षमपणे काम केले. केंद्र सरकारनेही काही चांगली कामे केली. त्यामुळे सर्वच गोष्टींवर टीका करणार नाही; मात्र एकीकडे देशातील खासदारांचा ‘खासदार निधी’ बंद केला आहे, तर स्वत:च्या प्रसिद्धीसाठी गेल्या ३ वर्षांत केंद्र सरकारने तब्बल १ सहस्र ६९८ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. म्हणजे केंद्र सरकार प्रतिवर्षी सरासरी ६०० कोटी रुपयांचा खर्च केवळ स्वतःच्या  प्रसिद्धीसाठी करत आहे, अशी टीका शिवसेनेचे ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.

डॉ. श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, वर्ष २०१७ मध्ये केंद्र सरकारने ‘वर्ष २०२२ पर्यंत देशात दीड लाख आरोग्य केंद्रे उभी केली जातील’, अशी घोषणा केली होती; परंतु ४ वर्षांनंतरही अवघी ५५ टक्के म्हणजे ८० सहस्र आरोग्य केंद्रेच उभारली गेली आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात ७० सहस्र आरोग्य केंद्रे कशी बनवणार ? याचेही उत्तर सरकारने द्यावे.