भ्रष्टाचाराची बजबजपुरी असल्यावर प्रश्नपत्रिका फुटण्यासारखे प्रकार घडणारच !
मुंबई – म्हाडाची परीक्षा घेणार्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर प्रा.लि. कंपनी’चे अधिकारी प्रीतेश देशमुख आणि त्याचे दोन मित्र यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ११ डिसेंबरच्या रात्री प्रश्नपत्रिकेची विक्री करण्यासाठी पुणे येथील विश्रांतवाडी परिसरात आले असतांना पोलिसांनी त्यांना पकडले. यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रश्नपत्रिका फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली ! – जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री
म्हाडाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटलीच नाही; मात्र परीक्षेपूर्वी गोपनीयतेचा भंग झाला. प्रश्नपत्रिका फुटण्याआधीच कारवाई करण्यात आली, असे स्पष्टीकरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी १२ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिले.
याविषयी अधिक माहिती देतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘प्रश्नपत्रिका फोडण्याआधीच पोलिसांनी या टोळीला पकडले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. या प्रकरणाचे अन्वेषण पोलीस करत आहेत. योग्य ती कारवाई करण्यात येईल. म्हाडाच्या परीक्षा अचानक रहित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात ५० सहस्र उमेदवार, तर दुपारच्या सत्रात ५६ सहस्र उमेदवार परीक्षा देणार होते. पुढील परीक्षेला विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका सिद्ध करेल.’’