२२ ते २४ जुलै २०२१ या कालावधीत महाराष्ट्रामध्ये अतीप्रमाणात पाऊस झाला होता. यामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी आणि ढोकवळे, तर वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर या ठिकाणी दरड कोसळून ५ हून अधिक जणांचा मृत्यूही झाला होता. काही ठिकाणी गुरे मरणे, वाहून जाणे आदी प्रकार घडले. यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या वेळी सर्व स्तरावरील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेटी देऊन आश्वासनांचाही पाऊस पाडला होता. यालाही ६ मास उलटले. अजून स्थानिक शेतकरी शासकीय साहाय्यापासून उपेक्षितच आहेत.
येथील सामान्य शेतकरी भात पिकावर आपला उदरनिर्वाह चालवतो. वंशपरंपरेनुसार प्रत्येकाच्या वाट्याला अर्धा एकरपासून ते १० एकरपर्यंत भूमी आहे; मात्र अतीवृष्टीमुळे या भूमीचे अक्षरश: वाळवंटात रूपांतर झाले आहे. शेतात ताली फुटल्या असून वाहून आलेल्या मोठमोठ्या झाडांचा खच शेतात पडला आहे. अतीवृष्टीतील हानीत रहायलाच घर निर्माण करताकरता नाकीनऊ आलेला सामान्य शेतकरी शेती कधी नीट करणार ? अतीवृष्टीमध्ये मृत पावलेल्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याचे सरकारने घोषित केले होते; मात्र या घोषणा हवेतच वीरून गेल्या आहेत, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. त्यामुळे या भागांतील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
कोयना धरणामुळे विस्थापित झालेला शेतकरी वर्षानुवर्षे अजूनही उपेक्षित जीवन जगत आहे. कुणाला भूमी नाही, तर कुणाला घरे नाहीत. एका बाजूला कोणतेही अर्थसाहाय्य मिळालेले नाही, तर दुसर्या बाजूला महसूल आणि कृषी विभाग वेळोवेळी अर्थसाहाय्य करत असल्याचा डांगोरा पिटत आहे. कोयनेच्या फुगवट्यामुळे या भागात दळणवळणाची कोणतीही साधने विकसित होऊ शकलेली नाहीत. आजही लाँच, बोट, नाव आदींच्या साहाय्याने इप्सित ठिकाणी जावे लागत आहे. अजूनही रुग्णाला नेण्यासाठी डालग्याचा उपयोग करावा लागतो. सामान्य जीवन जगण्यासाठी लागणार्या रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजाही येथील नागरिकांना उपलब्ध झालेल्या नाहीत, हे संतापजनक आणि लज्जास्पद आहे. त्यातच दळणवळण बंदीमुळे सर्वचजण आर्थिक गर्तेत अडकले आहेत. शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती सोबत सुयोग्य नियोजन आणि शासकीय योजनांची प्रभावीपणे कार्यवाही आवश्यक आहे. तरच अतीवृष्टीग्रस्त शेतकर्यांची प्रतीक्षा संपून त्यांना सुखाचे दिवस येतील, असे म्हणावे लागेल.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा