साधिकेवर प्रेमाचा वर्षाव करणारे सनातनचे पहिले बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. साधिकेला घशाचा त्रास चालू होणे आणि त्या कालावधीत पू. भार्गवराम रामनाथी आश्रमात काही दिवस निवासाला येणे

‘डिसेंबर २०१९ मध्ये पू. भार्गवराम प्रभु रामनाथी आश्रमात काही दिवस कुटुंबियांच्या समवेत निवासाला आले होते. त्याच काळात मला घशाचा त्रास चालू झाला होता. मला मुळीच बोलता येत नव्हते. खाणाखुणा किंवा स्पर्श करूनच मला सांगावे लागत होते. घसा तज्ञांनी ‘बोलू नका’, असा समुपदेशही (सल्लाही) दिला होता. त्यामुळे मी अगदी आवश्यक तेवढेच हळू आवाजात बोलत होते.

श्रीमती रजनी नगरकर

२. पू. भार्गवराम यांच्या आईने ‘साधिकेचा घसा दुखत आहे’, असे सांगताच त्यांनी साधिकेची विचारपूस करणे आणि साधिकेच्या घशावरून हात फिरवणे

‘माझा घसा दुखत आहे’, हे पू. भार्गवराम यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या आईला विचारले, ‘‘या अशा का बोलतात ?’’ तेव्हा त्यांच्या आईने ‘त्यांचा घसा दुखतो. त्यांना बोलता येत नाही’, असे सांगितले. ते जेव्हा जेव्हा भेटायचे, तेव्हा तेव्हा खुणेने मला विचारायचे, ‘‘आता बरे आहे का ?’’ मी नमस्कार करताच ते मला लगेच नमस्कार करत होते. एक दिवस ते मला त्यांच्या कोकणी भाषेत म्हणाले, ‘‘फाल्या (उद्या) बोलशील तू !’’ ‘संतांचे ते बोल, म्हणजे माझ्यासाठी झालेला संकल्पच आहे’, असे मला वाटले. एक दिवस त्यांनी आईने सांगताच माझ्या घशावरून हात फिरवला.

३. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे लक्षात येणे

या सर्व घटनांच्या वेळी मला पुष्कळ भरून आले. आपल्या दृष्टीस तो एवढासा जीव दिसतो; परंतु त्यांना सगळे समजते. त्यातून मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, निरीक्षण, इतरांचा विचार, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांना आधार देणे’, हे गुण लक्षात आले. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे माझ्या लक्षात आले. पू. भार्गवराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून हे ४ शब्द त्यांच्या चरणी अर्पण करते.’

– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(४.१.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक