अली अकबर यांची वेदना !

संपादकीय

भारताचे इस्लामिस्तान करण्याचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी सरकारने पावले उचलावित !

अली अकबर

केरळमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते अली अकबर यांनी ‘मी आणि माझी पत्नी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारणार’, असे घोषित केले आहे. त्यांच्या या घोषणेसमवेतच त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. ‘लहानपणी मदरशात त्यांचे लैंगिक शोषण झाले होते’, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. ‘केरळला वर्ष २०५० पर्यंत इस्लामी राज्य बनवण्याचे धर्मांधांचे ध्येय आहे. तसेच एस्.डी.पी.आय. ही संघटना जाहीररित्या त्याविषयी सांगत आहे. त्यांना भारताचे स्वातंत्र्य नको असून त्यांचे इस्लामी राज्य आणण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे चालू आहेत’, असेही त्यांनी म्हटले आहे. अली अकबर यांच्यासारख्या दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची ही विधाने धक्कादायक आहेत. त्यांनी भारताचे वास्तव, तसेच भीषण भविष्याविषयीच यातून सूचित केले आहे. मदरशांत होणार्‍या लैंगिक शोषणाच्या घटना अधूनमधून उघडकीस येतात. यापूर्वी उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि नुकतेच हिंदु धर्मात प्रवेश करून जितेंद्र त्यागी बनलेले पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी यांनी मदरशांच्या संदर्भात ‘तेथे आतंकवादी सिद्ध होतात’, असे विधान केले होते. यातून मदरशांची आणि तेथील शिक्षणाची स्थिती कळते. उत्तरप्रदेश येथे भविष्यात होणार्‍या निवडणुकांविषयी तेथील मुसलमान महिलांचे मत एका वाहिनीच्या प्रतिनिधीने घेतल्यावर त्यांनी ‘उत्तरप्रदेशमध्ये मदरशांमध्ये आता गणित, विज्ञान हे विषय शिकवले जातात. त्यामुळे आम्हाला बरे वाटते. अगोदर मदरशांमध्ये केवळ धार्मिक विषय शिकवले जायचे. हा चांगला पालट योगी सरकारने केला आहे’, असे विधान केले होते. यातून मुसलमान महिलांनाही ‘मदरशांत काहीतरी पालट हवा’, हे लक्षात येते.

पाकच्या एका मदरशातील व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यामध्ये मुसलमान महिलांना ‘शिरच्छेद कसा करायचा ?’ याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे दिसत आहे. यातून ‘किती टोकाचा द्वेष भिनवण्यात येतो ?’, याची कल्पना येईल. मदरशांची ही दु:स्थिती असतांना सरकार त्याविषयी ठोस निर्णय घेऊन पालट का करत नाही ? आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांनीही धडाडी दाखवत ७०० मदरसे बंद केले असून उर्वरित मदरशांचे शाळा, रुग्णालय, महाविद्यालय यांमध्ये ते रूपांतर करणार आहेत. मुख्यमंत्री हिंमत बिस्व सरमा यांच्याकडून बोध घेऊन आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भारतभरातील मदरशांविषयी ठोस निर्णय घ्यावा, ही जनतेची अपेक्षा आहे.

इस्लामी प्रदेश !

आता विषय राहिला तो केरळसहित सर्व भारतावर इस्लामी राज्य आणण्याच्या धर्मांधांच्या मनीषेचा ! ‘दार-उल-हरब’ला (जेथे इस्लामचे राज्य नाही तो प्रदेश) दार-उल-इस्लाम (जेथे इस्लामचे राज्य आहे तो प्रदेश) करण्याची शिकवण धर्मांधांना लहानपणापासूनच दिली जाते. परिणामी त्यांना कोणत्याही देशाशी इमान राखण्यास जमणे कठीण आहे. जेथे इस्लाम नाही, तेथे तो कोणत्याही प्रकारे आणणे, हे प्रत्येक इस्लामी अनुयायाचे जीवितकार्यच बनते. परिणामी एखादी संघटना याचे दायित्व स्वीकारून कार्य करू लागते. या जिहादकडे इस्लाममधील बुद्धीवाद्यांचा गट सोयीस्कररित्या कानाडोळा करतो आणि निधर्मी त्यांना बौद्धिक संरक्षण पुरवतात. वसीम रिझवी, अली अकबर यांसारखे एखादा जागृत होऊन त्याला विरोध करतो. अनेक सजग मुसलमानांना याविषयी वाटते; मात्र ते व्यक्त होत नाहीत. त्यांनी पुढे येण्याची आता आवश्यकता आहे. त्यामुळे भारतियांचा त्यांच्यावरील विश्वास टिकून राहील आणि त्यांचा आदर्श अन्य धर्मबांधवही घेऊन समर्थ भारताच्या निर्मितीत त्यांचे योगदान देतील.